Join us  

मुंबई उपनगर जिल्ह्यात ७२ लाखांपेक्षा अधिक मतदार, ७ हजारांपेक्षा अधिक केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:28 AM

प्रशासन सज्ज; जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश

मुंबई : मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून एकूण ७२ लाख २६ हजार ८२६ एवढे मतदार आहेत. या मतदारांना २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी ७ हजार ३९७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन व्हावे आणि ही निवडणूक शांततेत, सुरळीतपणे, नि:पक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे़ यासाठी सुमारे ६० हजार कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, माधवी सरदेशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्हयासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२२२११० सुरु करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणाºया 'स्वीप’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून लिंगभेद निर्मूलन जाणीवजागृतीसह महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांमध्ये मतदानाच्या दिवशी केवळ महिला कर्मचा-यांद्वारे संचालित होणारे प्रत्येकी एक मतदान केंद्र प्रतिकात्मक स्वरुपात उभारण्यात येणार आहे.दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. दिव्यांग मतदार व मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांना मदतनीस म्हणून स्काऊट व गाईड यांची मदत घेण्यात येणार आहे. इव्हीएम यंत्रावर ब्रेल लिपीमध्ये देखील माहिती असणार आहे.दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्थादिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणे सुलभ होणार आहे. गरजुंसाठी व्हील-चेअरची व्यवस्था असणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे यासाठी उपाय योजना के ली आहे.मतदानाच्या दिवशी २१ आॅकटोबरला दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्धकरून देण्यात येणार आहे. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, या अनुषंगाने दिव्यांग मतदारांची नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019