Join us  

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! प्रामाणिकपणात जगात दुसरा क्रमांक पटकावला; पहिल्या स्थानी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:36 PM

प्रामाणिकपणाच्या बाबतीत मुंबईकर जगात दुसऱ्या स्थानावर

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आज 'The Wallet Experiment'ची माहिती शेअर केली. शहरातील लोकांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी एक विशेष सामाजिक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनं जगात दुसरा क्रमांक पटकावला.

वॉलेट एक्सपिरिमेंट म्हणजे नेमकं काय?जगातील सर्वाधिक प्रामाणिक शहरं कोणती, कोणत्या शहरातील लोक अधिक प्रामाणिक आहेत, याचा शोध घेण्यासाठी रीडर्स डायजेस्टनं एक प्रयोग केला. या प्रयोगाच्या अंतर्गत रीडर्स डायजेस्टनं जगातील १६ मोठ्या शहरांमध्ये एकूण १९२ पैशांची पाकिटं जाणूनबुजून हरवली. प्रत्येक शहरात १२ पाकिटं हरवण्यात आली.

पैशाच्या पाकिटात होते ५० डॉलरजाणूनबुजून हरवण्यात आलेल्या पाकिटांमध्ये एका व्यक्तीचं नाव, पत्ता, फोन नंबर, कुटुंबाचा फोटो, कूपन आणि बिझनेस कार्ड ठेवण्यात आलं होतं. याशिवाय स्थानिक चलनाच्या स्वरुपात ५० डॉलर (मुंबईत हरवण्यात आलेल्या प्रत्येक पाकिटात ३६०० रुपये) होते. हरवण्यात आलेल्या १२ पाकिटांपैकी किती पैसे परत मिळतात, त्यावरून शहरांचा प्रामाणिकपणा मोजण्यात आला.

मुंबईचा क्रमांक दुसरा, हेलसिंकी पहिल्या स्थानीसामाजिक प्रयोगाच्या अंतर्गत मुंबईत १२ पाकिटं हरवण्यात आली. त्यातली ९ पाकिटं परत आली. या प्रयोगात फिनलँडमधल्या हेलसिंकी शहरानं प्रथम क्रमांक पटकावला. फिनलँडमध्ये हरवण्यात आलेल्या १२ पैकी ११ पाकिटं परत आली. या यादीत मुंबईनंतर न्यूयॉर्क आणि बूडापेस्ट (१२ पैकी ८), मॉस्को आणि ऍमस्टरडॅम (१२ पैकी ७), बर्लिन आणि ल्युबलियाना (१२ पैकी ६), लंडन आणि व्हर्साय (१२ पैकी ५) यांचा क्रमांक लागतो. पोर्तुगालच्या लिस्बन शहरात हरवण्यात आलेलं १२ पैकी केवळ १ पाकिट परत आलं. त्यामुळे या यादीत लिस्बन शहर तळाला आहे. 

टॅग्स :मुंबईआंतरराष्ट्रीय