Join us  

मुंबई महापौरांच्या लाल दिव्याला आरटीओचा रेड सिग्नल, महापालिकेला बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 8:52 PM

सरकारी वाहन खरेदीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडून १९ लाख रुपये किंमतीचे महागडे वाहन खरेदी करुन मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर वादात सापडले होते.

मुंबई :  सरकारी वाहन खरेदीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडून १९ लाख रुपये किंमतीचे महागडे वाहन खरेदी करुन मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर वादात सापडले होते. त्यानंतर आता या वाहनावर लाल दिवा कायम ठेवून त्यांनी नवीन वाद ओढावून घेतला आहे. प्रादेशिक वाहतूक कार्यालयाने याची गंभीर दखल घेत महापालिकेला नोटीस बजावली आहे. 

केंद्र सरकारने १ मे २०१७ रोजी अधिसुचना काढून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी वाहनांवरील लाल दिवे काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांत राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपल्या वाहनांवरील लाल दिवे काढले आहेत. शिवसेनेचे नेते व वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांनीही या नियमाचा मान राखला आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे महापौर काही दिव्याची हौस सोडण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे.

महापौरांकडे सध्या महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी आहे.  विद्यमान आमदार सुनील प्रभू महापौर असताना ही गाडी खरेदी करण्यात आली होती. मात्र ही गाडी चांगल्या स्थितीत नाही, अशी तक्रार आल्यानंतर महापालिकेने इन्होव्हा क्रिस्टा ही नवीन गाडी नुकतीच खरेदी केली आहे. परंतु या गाडीवर लाल दिवा लावणे नियमाच्या विरुद्ध असल्याने तात्काळ काढावा, असे ताडदेव आरटीओ कार्यालयाने पत्राद्वारे पालिकेच्या वाहतूक विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कळविले आहे.नियम मोडण्याची परंपरा-महाडेश्वर यांच्या आधी अडीच वर्षे महापौर असलेल्या स्रेहल आंबेकर यांनीही आपल्या गाडीवरुन लाल दिवा काढण्यास नकार दिला होता. मात्र आरटीओच्या पत्रानंतर महाडेश्वर काय भूमिका घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

अधिसुचनेची प्रत आलेली नाही-लाल दिव्यावर बंदी आणलेल्या केंद्राच्या अधिसुचनेची प्रत मिळालेली नाही. याबाबतची प्रत ज्या दिवशी माझ्याकडे येईल, त्या दिवशी माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढेन.-महापौर विश्वनाथ महाडेश्वर

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई