Join us  

Mumbai Railway Updates: 'मरे'मुळे रोजच 'लेट मार्क'; संतप्त प्रवाशांनी दिला 'अल्टिमेटम'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:23 AM

मध्य रेल्वेच्या बोजवाऱ्यामुळे ऑफिसला 'लेट मार्क' लागत असल्यानं हजारो चाकरमानी अक्षरशः वैतागलेत.

ठळक मुद्देउपनगरीय लोकलसेवेचे तीनतेरा वाजत असल्याचा संतापजनक अनुभव नोकरदार घेत आहेत.संतप्त प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना भेटून दहा दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला आहे.   मध्य रेल्वेमुळे 'लेट मार्क' लागत असल्याची तक्रार घेऊन प्रवासी डीआरएम ऑफिसमध्ये पोहोचले.

रविवारी दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेऊनसुद्धा सोमवारी सिग्नल फेल, मंगळवारी इंजिन फेल, बुधवारी रुळाला तडा, गुरुवारी पावसाचा अडथळा, शुक्रवारी आणखी काही... अशा पद्धतीने मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलसेवेचे तीनतेरा वाजत असल्याचा संतापजनक, उद्विग्न करणारा अनुभव नोकरदार घेत आहेत. घरातून वेळेत निघून देखील मध्य रेल्वेच्या बोजवाऱ्यामुळे ऑफिसला 'लेट मार्क' लागत असल्यानं हजारो चाकरमानी अक्षरशः वैतागलेत. त्यांच्यापैकीच एक असलेले टिटवाळ्याचे रहिवासी शेखर कापुरे यांनी आपल्या सहप्रवाशांसह आज मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना (डीआरएम) भेटून दहा दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला आहे.   

डोंबिवली-कल्याण आणि त्याच्या पुढे राहणारी मंडळी ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी पहाटेपासून घड्याळ्याच्या काट्यांवर धावत असतात.  परंतु, स्टेशनवर आल्यावर ट्रेन उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होते आणि सगळ्यांचीच सटकते. गेल्या काही दिवसांत ट्रेनचा गोंधळ रोजचाच झाला आहे. त्यामुळे गर्दीही प्रचंड वाढते आणि ऑफिस गाठेपर्यंत अक्षरशः जीव नकोसा होतो. त्यानंतर जेव्हा आपल्या नावापुढे 'लेट मार्क' लागतो तेव्हा मध्य रेल्वेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहण्यावाचून पर्याय नसतो. 

पावसाळ्यात तर 'मरे'चा पार बोऱ्या वाजत असल्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. यावेळी तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीपासूनच ही गत असल्यानं प्रवाशांचा राग वाढत आहे. त्याचाच प्रत्यय आज मध्य रेल्वेच्या मुख्यालयात आला. मध्य रेल्वेमुळे 'लेट मार्क' लागत असल्याची तक्रार घेऊन प्रवासी डीआरएम ऑफिसमध्ये पोहोचले. दहा दिवसांत नोटिशीला उत्तर न दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे. 

'मरे'च्या ढिसाळ कारभारामुळे याआधीही अनेकदा प्रवाशांनी 'रेल रोको' करून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कशीबशी सारवासारव केली होती आणि पुढचे काही दिवस लोकल वेळेत धावल्या होत्या. अन्यथा ही रखडपट्टी रोजचीच झाली आहे. उपनगरीय सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्या, मालगाड्या हा सगळा भार पेलताना प्रशासनाची तारेवरची कसरत होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन दहा दिवसांत काय उत्तर देतं, यावर बरंच काही अवलंबून आहे.

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबईमध्य रेल्वे