Join us  

मुंबईमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवक वाढल्याने डाळींसह कडधान्ये गडगडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:10 PM

मुंबई मार्केट : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये डाळींसह कडधान्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.

- नामदेव मोरे ( नवी मुंबई )

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये डाळींसह कडधान्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. आवक वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच भाव घसरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये जवळपास दोन वर्षांपासून अन्नधान्याचे दर नियंत्रणात आहेत. गहू, तांदूळ, डाळी व कडधान्याचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असेच आहेत.

गत काही महिन्यांत बाजारभाव वाढण्यापेक्षा कमी होऊ लागले आहेत. दिवाळीमध्येही मागणी वाढली असतानाही बाजारभाव कमी झाले आहेत. गत महिन्यात तूरडाळीची सरासरी १४० टन आवक होत होती. होलसेल मार्केटमध्ये ५५ ते ६५ रुपये किलो दराने तूरडाळ विकली जात होती. या आठवड्यात आवक तीनपटीने वाढून ५०० टनांवर गेली असून, दर ५३ ते ६४ रुपये झाले आहेत. चनाडाळीची आवकही ६० टनांवरून १७० टनांवर गेली असून, बाजारभाव एक रुपयाने कमी झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये चनाडाळ ५० ते ५४ रुपये किलो दराने विकली जात आहे. मसूरडाळीची आवकही ५० टनांनी वाढली आहे. रोज १४० टन आवक होत असून, बाजारभाव प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले आहेत.

मसूरडाळ ४३ ते ५३ रुपये कि लो दराने विकली जात असून, डाळीमध्ये सर्वात कमी दर मसूरलाच मिळत आहे. डाळी व कडधान्याचे दर एक ते दोन रुपयांनी कमी झाले असले तरी गूळ, तांदूळ, ज्वारी व बाजरीचे दर एक रुपयांनी वाढले आहेत. ही वाढ किरकोळ असून, प्रत्येक दोन दिवसांनी मार्केटमध्ये १ ते २ रुपयांचा फरक पडत असतो. मुंबईकर नागरिक प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेच्या दरम्यान किराणा भरत असतात. यावर्षी दिवाळी बाजार व महिन्याचा किराणा एकाच वेळी खरेदी करण्यावर भर देण्यात आला होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किरकोळ व होलसेल मार्केटमध्ये अन्नधान्य व डाळींचे दर कमी ठेवण्यात आल्याची माहिती बाजार समितीमधील जाणकारांनी दिली. या आठवड्यात रोज सरासरी ५०० टन अन्नधान्य व डाळींची विक्री झाली आहे. सर्वाधिक २०० ते २४० टन तांदूळ विक्री रोज झाली आहे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रशेतकरी