Join us  

मुंबई टपाल विभागातर्फे ‘नो युवर पोस्टमन’ उपक्रम, विशेष मास्कचेही अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 5:19 AM

राष्ट्रीय टपाल सप्ताह : कोरोना संकटात पोस्टाने बजावली महत्त्वाची जबाबदारी 

मुंबई : राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून मुंबई टपाल विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्राहकांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी मुंबई टपाल विभागातर्फे ‘नो युवर पोस्टमन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

यात मुंबईतील सर्व विभागात कार्यरत असणाऱ्या पोस्टमनला एक व्हर्च्युअल व्हीजिटिंग कार्ड देण्यात येणार आहे. यात पोस्टमन/पोस्टवूमन यांचे नाव, क्षेत्र क्रमांक, सेवाक्षेत्राचे नाव, संपर्क क्रमांक आणि फोटो अशी इत्थंभूत माहिती असणार आहे.  हे व्हर्च्युअल व्हीजिटिंग कार्ड विभागातील सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ग्राहकांना आपल्या विभागातील पोस्टमनकडून काही सेवा हवी असल्यास या कार्डचा उपयोग होणार आहे. किंवा एखाद्या आपत्कालीन स्थितीत ग्राहक थेट पोस्टमनसोबत संपर्क साधू शकतील. सध्या मुंबई शहर व उपनगरात एकूण १,५४९ पोस्टमन कार्यरत आहेत. यामुळे मुंबईकरांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. 

गुरुवारी रतन टाटा यांच्या कुलाबा येथील घरी जाऊन या व्हर्च्युअल व्हीजिटिंग कार्डचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईतील काही सेलिब्रिटी व खेळाडूंना हे कार्ड देण्यात आले. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे. यासोबतच मुंबई टपाल विभागाने मास्कचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एका विशेष मास्कचे अनावरण केले. या मास्कवर टपाल खात्याच्या तिकिटांचे तसेच शिक्क्यांचे चित्र अतिशय आकर्षकरीत्या उमटविले आहे. ‘फिलेटली दिना’निमित्त या विशेष मास्कचे अनावरण करण्यात आले. टपाल तिकिटांचा संग्रह आणि अभ्यास करणाऱ्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी या मास्कचे विशेष महत्त्व असणार आहे,  अशी माहिती मुंबईच्या मुख्य टपाल व्यवस्थापक स्वाती पांडे यांनी दिली.

कोरोनाच्या संकट काळात टपाल कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात गरजूंपर्यंत वैद्यकीय साधने, पीपीई किट्स, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तीवेतन, पार्सल इत्यादी पोहोचविण्याची त्यांनी  केलेली मेहेनत निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही स्वाती पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :पोस्ट ऑफिस