Join us

मुंबई पोलीस म्हणे, कितीही मोठे वादळ आले तरीही, त्यातून बाहेर काढण्यासाठी सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:07 IST

मुंबई : ''वादळाचा सामना करू घेऊन हातात हात ! ऊन, वारा, पाऊस असो, आम्ही देऊ सदैव आपली साथ..'' असे ...

मुंबई : ''वादळाचा सामना करू घेऊन हातात हात ! ऊन, वारा, पाऊस असो, आम्ही देऊ सदैव आपली साथ..'' असे म्हणत मुंबई पोलिसांनी नागरिकांची वादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत केली. मंगळवाऱी पहाटेपर्यंत अडकलेल्या व्यक्तीच्या सुटकेबरोबर मुंबई पोलिसांकड़ून रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्याचे काम सुरु होते.

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, वरळी सी फेस, हाजी अली, आणि दादर चौपाटीसह माहीम, वांन्द्रे, अंधेरी, जुहू, मालाड, मार्वे, गोराई अशा समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सोमवारी मुंबईत जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातील अनेक सखल ठिकाणी पाणी साचले होते. तर, काही ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडल्याने याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. अखेर पोलिसांनी पाणी साचलेल्या अंधेरी, मालाड येथील सब वे सह काही मार्गावरील वाहतूक व्यवस्था तात्पुरती बंद केली होती. तर, पायधुनीतील वाय. एम. मार्ग, दहिसर, पश्चिम द्रुतगती महामार्गासह विविध ठिकाणी पडलेली झाड़े पहाटेपर्यंत बाजूला केली. तर एस. व्ही. रोड येथे साचलेल्या पाण्यात बस मध्ये अडकलेल्या चालक, आणि कंडक्टरला सुखरूप बाहेर काढ़ले. भर पावसात रस्त्यावर उतरून सेवा बजावत असताना, दुसरीकडे मुंबई पोलीस त्यांच्या टवीटर हॅंडलवरून नागरिकांना प्रत्येक घडामोडी, बदललेल्या मार्गिकेबाबत माहिती देत होते. याच दरम्यान ''आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच कठीण होता. पण आपल्याला सुरक्षित ठेवण्याचे आमचे कर्तव्य आणि दृढनिश्चय सदैव निढळ राहील.

कितीही मोठे वादळ आले तरीही, मुंबईला वादळातून बाहेर काढण्यासाठी सज्ज! '' असे ट्वीट मुंबई पोलिसांनी केले आहे.

.....