Join us  

धारावीतील कोरोना युद्धात मुंबई पोलिसांनी बजाविली मोलाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 6:10 AM

कोरोनामुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली आहे.

मुंबई : धारावी परिसरात कोरोनाविरुद्धच्या युद्धात धारावीकरांची सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा ‘धारावी पॅटर्न’ समोर आला आहे. या मोहिमेत नागरिक आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.कोरोनामुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली आहे. ही बाब निश्चितच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या, यातून केवळ एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे अत्यंत कठीण होते. त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली. पोलिसांच्या गाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देणे, ड्रोनचा उपयोग करून त्यावरील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांना माहिती देऊन जागृत करणे, तसेच काही प्रसंगी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे अशा प्रकारची कामे पोलिसांनी केली. तसेच कोरोनाबद्दल काय दक्षता घ्यावी याची आॅडिओ क्लिप बनवून तिचे प्रसारण व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, सामाजिक सुरक्षा अंतर राखून मीटिंग घेऊन त्याद्वारे, तसेच मंदिर, मशीद यातील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांपर्यंत ती क्लिप, त्यातील माहिती पोहोचविली. अरुंद गल्ल्यांतून पायी गस्त घालून लोकांची जनजागृती केली.या भागातील ६१,४१५ परप्रांतीय कामगार श्रमिक रेल्वेने व १२,४९५ कामगार एस.टी.बसने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत तीन एसआरपीएफ तुकड्या, सशस्त्र पोलीस दलातील १०० पोलीस अंमलदार व धारावी पोलीस ठाण्यातील अधिकाºयासह ३८ वेळा रुट मार्च व २८ वेळा कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. या कालावधीत धारावीत ४० पोलीस कर्मचारी व १० राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली. त्यावर मात करून हे कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनात धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश नांगरे व त्यांच्या सहकाºयांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस