Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आता ‘अ‍ॅक्युप्रेशर ट्रॅक’, उद्यानांमध्ये अ‍ॅक्युप्रेशर शिट्स बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:31 IST

धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना काही काळ विरंगुळा व फिट ठेवण्यासाठी महापालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार केले आहेत.

मुंबई : धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना काही काळ विरंगुळा व फिट ठेवण्यासाठी महापालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार केले आहेत. या जॉगिंग ट्रॅकवर टोकदार आणि चुंबकीय वापराच्या अ‍ॅक्युप्रेशर शिट्स बसवून अ‍ॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक बनवण्याची मागणी जोर धरीत आहे. या अ‍ॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅकवर चालल्याने जॉगिंगला येणाºया मुंबईकरांचे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहील. त्यामुळे सार्वजनिक उद्यानात असे जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे.मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित आणि निरोगी राखणे हे प्रत्येकाला कठीण होत आहे. वेळी-अवेळी आहार घेणे, अतिप्रमाणात जंक फूडचे सेवन करणे, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, यामुळे शरीरावर याचा विपरीत परिणाम होतो. अलीकडे तरुणांमध्येच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड ग्रंथीमधील बिघाड इत्यादी वृद्धावस्थेत होणारे गंभीर आजार होत असल्याचे दिसून येत आहे.चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये वेदना आणि रोगमुक्त होण्यासाठी अन्य औषधांऐवजी अ‍ॅक्युप्रेशर या उपचार पद्धतीचा वापर जास्तीत जास्त केला जातो. त्यामुळे याचा अवलंब मुंबईतील उद्यानांमध्येही केला जावा, अशी मागणी नगरसेविका समृद्धी काते यांनी या ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेच्या महासभेपुढे केली आहे.सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी चालण्यासाठी असलेला मार्ग, टोकदार पृष्ठभागामध्ये मॅग्नेटच्या वापरासह तयार करण्यात आलेल्या चौकोनी आकाराच्या फायबर किंवा प्लॅस्टिकच्या पायघड्या टाकून आच्छादित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या सूचनेद्वारे केली आहे. ही मागणी महासभेत मंजूर झाल्यानंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येईल.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका