- मनोहर कुंभेजकरमुंबई - दिंडोशीतील अमली पदार्थ तस्करी, विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी आग्रही मागणी उद्धव सेनेचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात सुनिल प्रभू यांनी लिहिले की, मालाड (पूर्व), दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील मालाड (पूर्व) कुरारगांव व दिंडोशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट सुरू असून अमली पदार्थ सेवनामुळे या परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे.
या परिसरातील तरुण पिढी सदरहू अमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यसनाधीन होऊन त्यांचे भवितव्य लयास आले असल्याचे त्यांच्या पालकांची तक्रार आहे. शिवाय सदर प्रकरणी कुरार व दिंडोशी पोलीस ठाण्यात नागरीकांनी तक्रार दाखल केली असता पोलीसांकडून तात्पुरती व जुजबी स्वरुपाची कारवाई होत असल्याने येथील अमली पदार्थांची तस्करी व विक्री अद्यापही सुरु आहे. या प्रकारामुळे येथील जनतेत तीव्र संतापाचे व चिंतेचे वातावरण आहे.
दिंडोशीतील अमली पदार्थ तस्करी, विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करा अशी आग्रही मागणी उद्धव सेनेचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.
दिंडोशी व कुरर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात विशेषतः बुवा साळवी मैदान, पारेख नगर गार्डन, दिंडोशी न्यायालयामागील गार्डन, ओमकार एसआरए बिल्डिंग, तपोवन बिल्डिंग जवळचे गार्डन, पिंपरी पाडा माजी मार्केट, रत्नागिरी हॉटेल जवळील टार्मेट पार्किंग रोड, संतोष नगर मार्केट, शिवशाही वसाहत, म्हाडा वसाहत गणपती मंदिर जवळ, आंबेडकर नगर भाजी मार्केट, आप्पा पाडा वन विभाग, भीम नगर स्मशानाच्या आतमध्ये व बाजूच्या पार्किंग जवळ, बंजारी पाडा कुरार पोलीस स्टेशन समोर, सोनूपाडा वाघेश्वरी बिल्डिंग, कोकणी पाडा मंगेश शाळेजवळ, नर्मदा हॉल बाजूच्या आसपास परिसरात, पालनगर रोड, पक्कड कंपाऊंड, आप्पा पाडा मार्केट पोपट कंपाऊंड, आंबेडकर नगर-क्रांती नगर वन विभाग, मकबूल कंपाऊंड, आदि ठिकाणी तस्करी करुन आणलेल्या अमली पदार्थांची सर्रास दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात विक्री होते अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.
या बाबत यापूर्वी आपण विधानसभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती. यावर शासनाने कारवाई करण्याचे आश्वासन तत्कालीन गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतू अद्याप दिंडोशी विधानसभा क्षेत्रात अंमली पदार्थ तस्कारी, विक्री व सेवनाचे गैरप्रकार करणाऱ्यांचे रॅकेट समूळ उच्चाटण झाले नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे कडे वारंवार मागणी करून देखील कारवाई होत नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याचे आमदार प्रभु यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच वाईन शॉप अथवा बिअर शॉपीचा परवाना असलेल्या दुकानांसमोर तेथेच मद्य विकत घेऊन त्या दुकानासमोरच मधद्यप्रश्न अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. याबाबत देखील वारंवार तक्रार करून कोणत्याही प्रकारचे कारवाई करण्यात आलेले नाही. मोकळ्या जागेत रात्री उशिरा पर्यंत अमली पदार्थांचे अथवा मद्य प्राशन केले जाते. यामुळे महिलांच्या मनात सतत साशंकता निर्माण होऊन महिला सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली.
तसेच अधिवेशनात मंत्री महोदयांनी यांनी देखील याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते परंतू कारवाई झालेली नाही, यामुळे मंत्री महोदयांनी मला खोटे आश्वासन दिले होते. त्यामुळे याबाबत दुर्दैवाने मला नागपूर अधिवेशनात हक्क भंग आणावे लागेल असे देखिल सुनील प्रभू म्हणाले.