लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या ऑक्टोबरपासून मुंबई ते नवी मुंबई जलमार्गावर वॉटर टॅक्सी सेवेची चाचणी घेण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या या जलमार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशांतर्गत क्रूझ टर्मिनल (भाऊचा धक्का) ते बेलापूरदरम्यान वॉटर टॅक्सीची चाचणी सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाकडून केले जात आहे. येत्या काही आठवड्यात म्हणजे ऑक्टोबरपासून ''ट्रायल रन'' घेतले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नवी मुंबईला दक्षिण मुंबईशी जलमार्गाने जोडण्याची योजना गेल्या तीन दशकांपासून कागदावर होती; मात्र वेळोवेळी अडथळे आल्याने ती रेंगाळली. रस्तेमार्गावरील वाहतूक कोंडीचा भार कमी करण्यासह किनारपट्टीलगतच्या शहरांना थेट मुंबईशी जोडण्याचा उद्देश यामागे आहे.
''वॉटर टॅक्सी सुविधेच्या चाचण्या सुरू करण्याचे नियोजन असून, यासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांशी चर्चा सुरू आहे'', अशी माहिती महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली. ''एमएमबी''ने तयार केलेल्या अंतर्देशीय जल वाहतूक व्यवस्थेमुळे बेलापूर ते भाऊच्या धक्क्यापर्यंतचा प्रवास ८० मिनिटांवरून ४५ मिनिटांपर्यंत कमी होईल. ६० प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता असलेल्या स्पीड बोट्स आणि कॅटॅमरन्स या मार्गावर तैनात केल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.
तत्कालीन नौकानयन मंत्री मनसुख मांडविया यांनी १२ मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. यात देशांतर्गत टर्मिनल ते नेरूळ, बेलापूर, वाशी, ऐरोली, रेवस, कारंजा, धरमतर, कान्होजी आंग्रे बेट आणि ठाणे, तसेच बेलापूर ते ठाणे आणि गेट वे ऑफ इंडिया- वाशी ते ठाणे या मार्गांचा समावेश होता. पैकी बेलापूर-मुंबई मार्ग पूर्ण झाला असून, तीन ऑपरेटर्सनी सेवा सुरू करण्यात रस दाखवल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
तिकीट किती असेल?
मुंबई पोर्ट ट्रस्टकडून अद्याप शुल्कनिश्चिती झाली नसली तरी, प्रतिप्रवासी ३०० रुपयांपर्यंत दर आकारला जाऊ शकतो. लोकल रेल्वेच्या द्वितीय श्रेणी तिकिटापेक्षा हा दर खूपच महाग आहे. नवी मुंबईकरिता उपनगरी रेल्वेच्या द्वितीय श्रेणीचे तिकीट १५ रुपये, तर प्रथम श्रेणीसाठी १५० रुपये आकारले जातात, असे असले तरी खासगी वाहने आणि कॅबच्या तुलनेत हा प्रवास कमी खर्चिक आणि आरामदायी असेल.