Join us  

महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता; अधिसूचनेची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 6:33 AM

महापालिकेचे नऊ प्रभाग वाढविण्यात येणार असल्याने प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ एवढी होणार आहे. पालिकेने यापूर्वी २२७ प्रभागांच्या रचनेचा मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. मात्र आता नऊ प्रभाग वाढविण्यात आल्यानंतर सर्व प्रभागांचे पुन्हा सीमांकन करून सुधारित मसुदा तयार करावा लागणार आहे.

मुंबई: लोकसंख्येच्या आधारावर मुंबईत नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आगामी पालिका निवडणुकीसाठी २३६ प्रभागांच्या फेररचनेचा आराखडा तयार केला जात आहे. मात्र पंधरवडा उलटत आला तरी अद्याप याबाबतची अधिसूचना नगरविकास खात्याने महापालिकेला पाठविलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महापालिकेचे नऊ प्रभाग वाढविण्यात येणार असल्याने प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ एवढी होणार आहे. पालिकेने यापूर्वी २२७ प्रभागांच्या रचनेचा मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. मात्र आता नऊ प्रभाग वाढविण्यात आल्यानंतर सर्व प्रभागांचे पुन्हा सीमांकन करून सुधारित मसुदा तयार करावा लागणार आहे. लोकसंख्येच्या आधारे फेररचना केल्यानंतर पूर्व उपनगरांत चार, तर पश्चिम पाच प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. परंतु याबाबतचा अध्यादेशच प्राप्त न झाल्याने या निवडणुकीच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. 

.... तर निम्मे काम पूर्ण झाले असते-  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याबाबतची अधिसूचना २३ नोव्हेंबर उलटला तरी महापालिकेला प्राप्त झालेली नाही. -  सरकारने अधिसूचना त्वरित पाठवली असती तर, निवडणूक प्रक्रियेचे ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाले असते. मात्र अधिसूचना अद्याप पाठविण्यात न आल्याने पुढील प्रक्रियेलाही विलंब होणार आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकानिवडणूकमुंबई