Join us  

धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून पुन्हा कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:18 AM

दाटीवाटीच्या झोपडपट्टीतून कोरोनाला लावले पळवून

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान जगासमोर असताना आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीतून हा विषाणू मुंबई पालिकेने पळवून लावला आहे. पालिकेच्या या लढ्याचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केल्यानंतर अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने गौरव केला. मात्र या यशाने हुरळून न जाता यापुढेही कोरोनाविरुद्धचा लढा सुरू राहील, असा निर्धार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी पारदर्शक असून पालिकेचे काम परिणामकारक असल्याचे मत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने काही दिवसांपूर्वी आपल्या लेखातून व्यक्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला आलेल्या यशाचे कौतुक या वृत्तपत्राने शुक्रवारी विशेष लेखातून केले. धारावीमधील लढ्याने दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या अन्य शहरांसाठी आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुक या लेखात आहे.दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये राहणारे आठ ते दहा लोक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत होता. त्यामुळे जी उत्तर विभागातील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि पथकाने मैदान, उद्यान, सभागृह, खासगी रुग्णालयांची जागा ताब्यात घेऊन संस्थात्मक विलगीकरण ही संकल्पना राबविली. जास्तीतजास्त रुग्णांची तपासणी, तत्काळ निदान, योग्य उपचार आणि लवकर डिस्चार्ज यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले.देशाने धडा गिरवावाआठ ते दहा लाखांची लोकवस्ती असलेल्या धारावीकडे संपूूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंग आणि रुग्णांचा शोध घेणे जवळजवळ अशक्य होते. मात्र, मुंबई पालिकेच्या उपाययोजना, कोरोना रोखण्यासाठी सर्व समाजघटकांचा सहभाग आणि धारावीकरांची चिकाटी यामुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. आज दिवसाला फक्त दोन ते चार रुग्ण सापडत असून धारावी कोरोना नियंत्रणाचे आदर्श उदाहारण बनली आहे. कोरोनाचा कहर कितीही असला तरी त्यातून बाहेर पडता येते, हे धारावीने दाखवून दिले. धारावीचा धडा संपूर्ण देशाने गिरवावा, असा सल्ला ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या विशेष लेखात दिला.लढा यापुढेही सुरू ठेवणारमुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूबाबत दिली जाणारी माहिती पारदर्शक असल्याचे कौतुक वॉशिंग्टन पोस्टने काही दिवसांपूर्वी केले होते. आता पुन्हा धारावीतील लढ्याची या वृत्तपत्राने दखल घेतली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येत असले तरी यापुढेही हा लढा असाच सुरू राहील.- इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका 

टॅग्स :धारावीमुंबई