Join us  

श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात होणार मोठे बदल, दर ५ मिनिटाला बस अन् बरंच काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:21 AM

मुंबईच्या श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात पालिकेकडून भाविकांसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईच्या श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात पालिकेकडून भाविकांसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात विविध सुविधांचा समावेश असणार आहे. मंदिराभोवती होणारी गर्दी टाळण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांचे स्थलांतर दुसऱ्या मार्गावर करण्याचे प्रस्तावित असून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना श्रीसिद्धिविनायकाच्या दर्शनाचा लाभ शांततेत, व्यवस्थित घेता येणार आहे.

पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होणार आहे. 

प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा - 

 मंदिराच्या दोन्ही मार्गांवर भव्य प्रवेशद्वार उभारणे.

 अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करणे.

 दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था.

 ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता छत.

 मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण, भाविकांसाठी वाहनतळ. 

 मंदिराच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना.

 दर ५ मिनिटाला दादर रेल्वे स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर ‘बेस्ट’तर्फे मिनी बस. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराची नेमणूक :

मंदिरात येणाऱ्या भाविकांना उच्चतम दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेमार्फत ‘स्वारस्याची अभिव्यक्ती’ मागवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार-वास्तुशास्त्रज्ञाची निवड करण्यात येणार आहे.

प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार-वास्तुशास्त्रज्ञ यांनी दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष व आमदार सदा सरवणकर, उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

प्रकल्पाचे कामकाज कुणाकडे?

जी उत्तर, जी दक्षिणचे सहायक आयुक्त, विकास नियोजन विभागाचे अभियंता, रस्ते, वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता इमारत बांधकाम विभागाचे नगर उपअभियंता प्रकल्पाचे कामकाज पाहणार आहेत.

टॅग्स :मुंबईसिद्धिविनायक गणपती मंदिरनगर पालिका