Join us  

दिवाळी खरेदीसाठी सजल्या मुंबईच्या बाजारपेठा; नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 1:20 AM

विशेषत: मशीद बंदर, गिरगाव, भायखळा, लालबाग, दादर, माहीम, सायन, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, घाटकोपर, कुर्ला आणि मुलुंड येथील छोट्यामोठ्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी हाेती.

मुंबई : प्रकाशाचा आणि आनंदाचा सण अशी ओळख असणाऱ्या दीपावलीची खरेदी मुंबईकर उत्साहाने करत आहेत. त्यामुळे दिवाळीचे आकाशकंदील, रांगाेळी, फटाके, राेषणाई यासह मुंबईकरांच्या गर्दीने बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान, खरेदीवेळी मुंबईकरांनी फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नियम पाळा, कोरोनाला आमंत्रण देऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.गुरुवारी वसुबारसच्या निमित्ताने बाजारपेठांमधील गर्दी वाढली होती. विशेषत: मशीद बंदर, गिरगाव, भायखळा, लालबाग, दादर, माहीम, सायन, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, घाटकोपर, कुर्ला आणि मुलुंड येथील छोट्यामोठ्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी हाेती.

दिवाळीच्या फराळाचे साहित्य घेण्यासह दिवाळीचा तयार फराळ घेण्यासाठी, कंदील, रांगोळी, दिव्यांच्या खरेदीसह उर्वरित खरेदीकरिता बाजरापेठांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. काेराेनाची भीती न बाळगता लालबाग, दादर, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी या प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्सवी माहोल पाहावयास मिळाला. दिव्यांचे तोरण, फुले, उटणे, चिरोटे आदी साहित्य खरेदीची लगबग हाेती. नेहमीच्या तुलनेत फटाक्यांच्या स्टॉलवर गर्दीचे प्रमाण कमी होते. नव्या वस्त्रांच्या खरेदीचे प्रमाणही तुलनेने कमी हाेते. 

टॅग्स :दिवाळी