Join us

शिवकालीन खेळांचा महाकुंभ!, दोन लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज

By स्नेहा मोरे | Updated: January 24, 2024 20:34 IST

Mumbai Sports News: लगोरी, लेझीम, लंगडी , पंजा लढवणे अशा डिजिटल जगात इतिहासजमा झालेल्या खेळांना पुन्हा एकदा वैभव प्राप्त होणार आहे. मुंबईत पहिल्यांदा श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महाकुंभ रंगणार आहे

मुंबई - लगोरी, लेझीम, लंगडी , पंजा लढवणे अशा डिजिटल जगात इतिहासजमा झालेल्या खेळांना पुन्हा एकदा वैभव प्राप्त होणार आहे. मुंबईत पहिल्यांदा श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महाकुंभ रंगणार आहे, या महाकुंभासाठी दोन लाखांहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.  शिवकालीन खेळांचा हा महाकुंभ २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईच्या विविध भागांत रंगणार आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी वरीळीतील जांभोरी मैदानात करण्यात येणार आहे. शिवकालीन खेळांच्या महाकुंभात लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीवरील उड्या, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या १६ पारंपारिक खेळांचा समावेश आहे. तसेच, या कालावधीत आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव व ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी होतील.

२७ गडकिल्ल्यांचे प्रदर्शनया उपक्रमाच्या निमित्ताने राज्यातील २७ किल्ल्यांचे प्रदर्शन उभारले जात असून प्रदर्शनाच्या माध्यमातून किल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सुद्धा उद्घाटन प्रसंगी सादर केली जातील. या स्पर्धेचे पावित्र्य जपण्यासाठी रायगडावरून शिवज्योतीचे मुंबईमध्ये आगमन होणार आहे.

शिवकालीन खेळांसाठी मैदाने सज्जमुंबई उपनगरात अंधेरी, बोरीवली, कुर्ला, मुलुंड या चार ठिकाणी तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. मल्लखांब, कबड्डी व खो-खो या खेळ प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिमस्तराचे सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर नऊ खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा सहा ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण २० मैदान आणि सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. त्यातील अंतिम स्पर्धा १० मैदान आणि सभागृहात होणार आहेत.

टॅग्स :मुंबई