Join us  

स्थलांतरित नागरिक पालिकेच्या रडारवर मुंंबई महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 6:39 AM

बंद घरांवर लक्ष : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने उपाययाेजना

मुंबई : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी वर्तविले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महानगरपालिका यंत्रणाही कसून तयारीला लागली आहे. शहर, उपनगराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसू नये याकरिता मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील स्थलांतरित नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत स्थलांतर करणाऱ्या, पण सध्या बंद घरांची मुंबई महानगरपालिकेने यादी तयार केली आहे. या यादीत २० हजार कुटुंबांची नोंद करण्यात आली असून यातील ८ हजार कुटुंबे इमारतींमध्ये तर १२ हजार कुटुंबे चाळसदृश व झोपडपट्टीत राहणारी आहेत, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

दिल्लीत वाहतुकीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांविषयी माहिती देताना काकाणी यांनी सांगितले, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतून मुंबईत येणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या राज्यांमध्ये मुंबईच्या तुलनेत संसर्गाची तीव्रता अधिक आहे. परिणामी, हीच साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत मुंबईत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. अनेक घरे बंद आढळली. बरेच लोक अजूनही त्यांच्या गावाहून परत आले नाहीत. काही आरोग्य कर्मचारी बंद घरांवर नजर ठेवून आहेत. दुसऱ्या राज्यातून आलेल्यांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी इ. तपासले जाईल. इतर कोणत्याही राज्यातून अलीकडेच मुंबईत आलेल्यांची विनामूल्य कोविड चाचणी केंद्रात जाऊन तपासणी करण्यात येईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

माेफत काेराेना चाचणी केंद्रांची सुविधामुंबई महापालिकेने मुंबईत सुरू केलेल्या नि:शुल्क कोविड चाचणी केंद्रांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई पालिकेने शहरातील २४४ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. कोरियन देशाच्या मॉडेलच्या अनुषंगाने पालिकेने विविध ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू केली. मुंबईतील अशा ३०० केंद्रांमध्ये आरटीपीसीआर आणि कोरोनाची जलद चाचणी हाेते. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी त्यांची तपासणी केली. यात २ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका