Join us  

Mumbai Rail Roko : दगडफेकीमुळं लाठीचार्ज करावा लागला - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 11:19 AM

विद्यार्थांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर रेल्वेरोकोवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला.

मुंबई -  रेल्वे भरतीतल्या अभूतपूर्व गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत  दादर-माटुंग्या दरम्यान रेल रोको केला होता. या रेल रोकोमुळे कामावर जाणा-या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. याची दखल घेत रेल्वेने घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

विद्यार्थांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर रेल्वेरोकोवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठी चार्जवरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. यावरुन सत्ताधारी भाजपाला प्रश्न विचारण्यात आला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: उत्तर दिले. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वेने अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी सकाळी केलेल्या आंदोलनामुळं सीएसटीच्या दिशेनं जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रेल्वेने आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. सकाळी आंदोलन कर्त्यांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळं त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुढे बोलाताना ते म्हणाले की, सध्या रेल्वे आणि अंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सूरु आहे. त्यांना नोकरीत घ्यावं अशी मागणी होती.  100% अॅप्रेंटिस लोकांना नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी होती. पण तसं केल्यास अन्य शिक्षित तरुणावर अन्याय होईल त्यामुळे त्यांच्यासाठी 20 % जागा राखीव ठेवल्या आहेत. लवकरच यावर योग्य तो तोडगा निघेल. 

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या - 

पंतप्रधान स्किल इंडियाची भाषा करतात आणि अनेक वर्षे रेल्वेमध्येच अॅप्रेंटिस केलेल्या विद्यार्थांना डावलून रेल्वे भरती प्रक्रिया राबवली जाते.या अनुभवी विद्यार्थ्यांचा उद्रेक होणे साहजिकच आहे. पियूष गोयल आंदोलकांवर काठ्या बरसवण्यापेक्षा त्यांच्या मागण्या आधी समजून घ्यायला हव्या. 

धनंजय मुंडेंचा आरोप - 

रेल्वेभरती परिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत याची गंध वार्ताही सरकारला असू नये हे Intelligence Failure आहेच तसेच  गेल्या 3 वर्षात सातत्य पूर्ण रित्या रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई रेल रोकोमुंबई उपनगरी रेल्वे