Join us  

जगात भारी... मुंबई महानगरी; महागड्या घरांच्या यादीत आर्थिक राजधानी चौथ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 9:12 AM

मुंबईचे वाढते महत्त्व कारणीभूत, १८% - घरांच्या किमती कोट्यवधींमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आता जगाच्या नकाशावर असलेल्या महागड्या घरांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर झेपावले आहे. आजवर जगातील महागड्या शहरांच्या यादीत मुंबई शहराचा क्रमांक १८वा होता. मात्र, गेल्या वर्षभरात मुंबई शहरातील घरांच्या किमतीमध्ये साडेसहा टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामुळे शहरातील घरांच्या किमतीने देशातही नवा विक्रम गाठला आहे.

    बांधकाम क्षेत्रातील नाइट फ्रँक या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. मुंबईपाठोपाठ दिल्ली, बंगळुरूतील किमतीतही वाढ झाली असून, या दोन्ही शहरांनीदेखील वरचा क्रमांक गाठला आहे. आजवर महागड्या घरांच्या यादीत दिल्लीचा क्रमांक ३६वा होता. दिल्ली आता १०व्या क्रमांकावर आलेली आहे, तर बंगळुरू शहर २७व्या क्रमांकावरून १७व्या क्रमांकावर आले आहे. 

    दरवाढीचे वैशिष्ट्य...

    मुंबई शहरातील दरवाढीचे वैशिष्ट्य म्हणजे, मुंबई व परिसरात आजच्या घडीला न विकल्या गेलेल्या घरांची संख्या लक्षणीय आहे. याचाच अर्थ मागणीपेक्षा पुरवठा अधिक असला तरी मुंबईच्या किमतीमध्ये कपात झालेली दिसत नाही. तसेच, अशा स्थितीत मुंबईचे दर स्थिर असणे अपेक्षित होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

    मुंबईचे वाढते महत्त्व

    • मुंबईत झालेली दरवाढ ही शहरात होत असलेल्या विकासकामांमुळे शहराचे महत्त्व वाढत असल्याचे द्योतक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
    • चालू वर्षात अनेकजण लहान घराकडून मोठ्या घरांच्या विक्रीकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
    • चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहरात एक लाखांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी झाली आहे. 
    • यामध्ये निवासी मालमत्तांचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. तर, या ८२ टक्क्यांपेक्षा १८ टक्के घरांच्या किमती या कोट्यवधींच्या घरात आहेत.
    टॅग्स :मुंबई