Join us  

न्यू दिंडोशीमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:59 AM

न्यू दिंडोशी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मनोहर कुंभेजकरमुंबई - न्यू दिंडोशी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू म्हाडा कॉलनीतील गिरीकृंज गृह संस्था उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता  नागरिकांना बिबट्या दिसला. यापूर्वी 11 नोव्हेंबरला रात्री 11.30 वाजता आणि बुधवारी 14 नोव्हेंबरला मध्यरात्री 12.30 वाजता बिबट्या परिसरात दिसून आल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट पसरली आहे. 

मनुष्य वस्तीत वावरणारा हा बिबट्या वाघनर भक्षक देखील होऊ शकेल आणि हे सर्व टाळण्याकरिता बिबट्या मनुष्य वस्तीत येण्यापासून रोखण्याकरिता खबरदारीच्या उपाय योजना त्वरित करणे आवश्यक झाले आहे, असे मत या सोसायटीच्या खजिनदार डॉ.रामेश्वरी पाटील व सचिव अनुष्का भोसले यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

यापूर्वी 2017 रोजी न्यू म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 5 आणि इमारत क्रमांक 20, 21च्या आवारात रात्री बिबट्या आला होता. न्यू म्हाडा कॉलनी परिसरात बिबट्याच्या वावर वाढल्याने  येथील नारिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. न्यू म्हाडा कॉलनीला लागूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने बिबट्या कधीही येथे येऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

मनुष्य वस्तीत या बिबट्या-वाघाच्या संचारावर कायमस्वरुपी नियंत्रण करण्याच्या उपाय योजना करण्याचे आदेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संबंधित अधिका-यांना तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी गेल्या आठवड्यात  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिवांकडून मनुष्य वस्तीत संचार करणा-या बिबट्या वाघाच्या संचारावर कायमस्वरुपी नियंत्रण करण्याच्या उपाय योजना करून लवकर अहवाल मागवला असल्याची माहिती आमदार सुनिल प्रभू यांनी लोकमतशी बोलताना दिली.दरम्यान, बिबट्याच्या मुक्त संचारावर ठोस उपाययोजना राबवली जावी, यासाठी  विधानसभेत आवाज उठवणार असल्याचंही प्रभू यांनी सांगितलं. 

टॅग्स :बिबट्यामुंबई