मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मुंबई-कोल्हापूर मार्गावर १ आॅक्टोबरपासून एसी शिवनेरी सेवा सुरू केली. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सेवेला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर एक महिन्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांपेक्षाही अधिक असलेले भाडे आणि अधिक प्रवाशांपर्यंत न पोहोचलेली सेवा यामुळे एसी शिवनेरी बंद करण्यात आली. नवरात्रौत्सवात मुंबईतील अनेक भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जातात. त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावर एसी शिवनेरी बस १ आॅक्टोबरपासून सुरू केली. मुंबई सेंट्रल स्थानकातून बस रात्री ११ वाजता सुटून सकाळी ६ वाजता कोल्हापूरला तर परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून रात्री ११ वाजता निघून सकाळी ६ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचत होती. या सेवेचे भाडे प्रत्येकी १ हजार ४३ रुपये ठेवण्यात आले होते. मात्र याच मार्गावर धावणाऱ्या खासगी बसपेक्षाही एसटीचे भाडे जादा असल्याने प्रवाशांनी सेवेकडे सुरुवातीपासूनच पाठ फिरवली. मुंबईतून जाताना आणि कोल्हापूरहून येताना प्रत्येकी सात ते आठ प्रवासीच एसी शिवनेरीसाठी मिळत होते. नोव्हेंबर १ तारखेपर्यंत या सेवेचे भारमान १0 टक्क्यांपेक्षाही जास्त राहिले नाही. अखेर प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच ३ नोव्हेंबर रोजी सेवा बंद करण्यात आली. मुंबई-कोल्हापूर मार्गावर पाच वर्षांत ही तिसरी एसी सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. मात्र एकाही सेवेला प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर स्लीपर व पुश बॅकसारख्या एसी सेवा देण्यात आल्या होत्या. परंतु एसी सेवेला प्राधान्य न मिळाल्याने महामंडळ तोंडघशी पडले आहे.
मुंबई-कोल्हापूर एसी शिवनेरी सेवा बंद
By admin | Updated: November 9, 2016 04:14 IST