Join us  

Mumbai Dongri Building Collapsed: VIDEO - मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, 40 ते 50 जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:28 PM

डोंगरी भागातील कौसरबाग या चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळला.

मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरी भागातील तांडेल स्ट्रीटवरील कौसरबाग या चार मजली इमारतीचा निम्मा भाग कोसळला. ही इमारत चार मजली असून दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत कोसळल्याने या भागात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच, घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे.  

याचबरोबर, कोसळलेल्या इमारातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, डोंगरीमध्ये अत्यंत चिंचोळ्या भागात ही इमारत असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे समजते.

तसेच, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश असल्याचे स्थानिकांकडून समजते.  याशिवाय, कौसरबाग इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या तीन-चार इमारतीही रिकाम्या करण्याचे काम सुरु आहे. या सर्व इमारती जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे.  

इमारत 100 वर्षे जुनी,  मुख्यमंत्र्यांनी दिली माहितीकौसरबाग इमारत 100 वर्षे जुनी होती. म्हाडाच्या अखत्यारीत येणारी ही इमारत पुनर्विकासासाठी विकासकाला दिली होती. मात्र, या विकासकाने पुर्नविकासाचे काम वेळात सुरू केले होते की नाही, याची चौकशी केली जाईल. तसेच, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीत 15 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :मुंबई