Join us  

CoronaVirus News: कोरोनामुळे दगावलेल्या आईचा मृतदेह मुलालाच बॅगमध्ये भरण्यास सांगितलं; रुग्णालयाचा पीपीई देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 9:13 AM

मुंबईच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार

मुंबई: कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी मुलाला आईचा मृतदेह बॉडी बॅगमध्ये ठेवण्यास सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयानं मुलाला पीपीई न देताच त्याला आईचा मृतदेह रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यास सांगितलं. हा प्रकार समोर येताच रुग्णालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.पल्लवी उतेकर यांना ३० जूनला कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयातल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनी २ जुलैला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी मुलाला तातडीनं बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला काही अर्ज भरून देण्यास सांगितले. मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत असताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आईचा मृतदेह बॉडी बॅगमध्ये भरण्यास सांगितल्याचा आरोप मुलानं केला.शताब्दी रुग्णालयात घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं पल्लवी उत्तेकर यांच्या मुलानं सांगितलं. 'मृतदेह बॉडी बॅगमध्ये भरून तो स्ट्रेचरवरून तळमजल्यावर घेऊन जा, असं मला सांगण्यात आलं. माझ्याकडे पीपीई किट नाही. त्यामुळे मला कोरोनाचं संक्रमण झाल्यास काय?, अशी विचारणा मी केली. मात्र त्यांनी मलाच मृतदेह बॉडी बॅगमध्ये भरण्यास सांगितलं. त्यामुळे मी आईचा मृतदेह बॅगमध्ये भरला. त्यावेळी माझा चुलतभाऊ सोबत होता. आईचा मृतदेह बॅगमध्ये भरल्यावर मला तो स्ट्रेटरवरून तळमजल्यावर नेण्यास सांगितलं,' अशा शब्दांमध्ये उत्तेकर यांच्या मुलानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची वागणूक अतिशय वाईट होती. हा प्रकार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्याच्या कानावर घेतला. त्यांनी रुग्णालयातल्या वरिष्ठ डॉक्टरांनी घडलेली घटना सांगितली. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं आहे, अशी माहिती मुलानं दिली. 'आम्ही या प्रकरणी डॉक्टर प्रमोद नगरकर यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. हा संपूर्ण प्रकार घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरवरदेखील कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे,' अशी माहिती मनसेचे नेते दिनेश साळवी यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या