मुंबई: मुलुंडमधील ऍपेक्स कोविड-१९ रुग्णालयात आग लागल्याची घटना काल संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. या आगीत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ऍपेक्स रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मरला संध्याकाळी आग लागली. यामुळे रुग्णालयातील ४० जणांचा जीव धोक्यात सापडला. यापैकी काही कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या रुग्णाची स्थिती चिंताजनक आहे. रुग्णालयातल्या इतर ३८ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची माहिती त्यांनी दिली. आग लागताच रुग्णालयात सर्वत्र धूर पसरला. यानंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आयसीयू आणि इतर वॉर्डमधील रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं.
मुलुंडमधील कोविड रुग्णालयात आग; एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती गंभीर
By कुणाल गवाणकर | Updated: October 13, 2020 09:51 IST