Join us  

मुंबईसह उपनगरात रात्री पावसाची धुवाधार बॅटिंग, राज्यातही येत्या 48 तासांत बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 2:41 AM

 शनिवारी रात्रभर मुंबईसह उपनगरातील वांद्रे, अंधेरी आणि गोरेगावसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुंबई, दि. 17 -  मुंबईत सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सकाळी पाऊस आणि दुपारी उन्हाच्या झळा अशा दुहेरी वातावरणामुळे मुंबईकरांना हवामान बदलाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असतानाच शनिवारी रात्री मुंबईसह उपनगरातील वांद्रे, अंधेरी आणि गोरेगावसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उपनगरात रात्री साडे-अकराच्या सुमारास वाहतुकीचा खेळ-खंडोबा झाला. तसेच, अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.  

गेल्या दोन दिवसांप्रमाणेच शनिवारी सकाळी मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या सरींना सुरुवात झाली. पण, दुपारनंतर पडलेल्या कडक उन्हाने मुंबईकरांचा घाम काढला. पुढच्या २४ तासांमध्ये शहरासह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी अथवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

शनिवारी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीचपर्यंत कुलाबा येथे १६.२ मि.मी. तर सांताक्रूझ येथे १४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली. सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत शहर परिसरात १०.९७ मि.मी., पूर्व उपनगरात ६.२१ मि.मी. आणि पश्चिम उपनगरात १४.०९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसामुळे एका घराच्या भिंतीचा भाग कोसळल्याच्या घटनेची नोंद आहे. तर शहरात २ आणि उपनगरात १ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या आणि दिवसभरात पाच ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. दुपारपासून मात्र मुंबईत प्रचंड उकाडा जाणवू लागला. कुलाबा येथे आर्द्रतेची नोंद ९४ टक्के तर सांताक्रूझ येथे ८६ टक्के करण्यात आली. आर्द्रता वाढल्याने मुंबईकर घामाने हैराण झाले आहेत. उष्णतेचे विविध आजार डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.राज्यातही बरसणार...गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तासांत कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात ब-याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :मुंबई