Join us

मुंबई-गोवा महामार्ग जाम

By admin | Updated: May 9, 2015 22:51 IST

मे महिन्यात शाळा, कॉलेजला असलेल्या सुट्ट्या तसेच या महिन्यात मोठ्या संख्येने विवाहाचे मुहूर्त असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील

रोहा : मे महिन्यात शाळा, कॉलेजला असलेल्या सुट्ट्या तसेच या महिन्यात मोठ्या संख्येने विवाहाचे मुहूर्त असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दररोज परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. शनिवारी विवाहाचे मुहूर्त असल्याने महामार्गावर रहदारी वाढली होती. त्यातच अवजड वाहनेही याच मार्गावरून जात असल्याने सकाळपासूनच महामार्गावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम व खड्डेमय रस्ते आदी समस्यांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे नागरिकांना नकोसे होते. तासन्तास वाहतूक कोंडी सुटत नसल्याने प्रवाशांबरोबरच वाहनचालकही हैराण झाले होते. काही वाहनांमध्ये लग्नाची वऱ्हाडी मंडळी होती. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांनाही शुभमुहूर्त साधताना चांगलीच कसरत करावी लागली. गणपती, होळी, दसरा व दिवाळी सणांच्या वेळी ज्याप्रमाणे वाहतूक व्यवस्था पाहिली जाते, तशाप्रकारची व्यवस्था मे महिन्यात देखील करणे आवश्यक आहे. याशिवाय वडखळ नाका, सुकेली खिंड, कोलाड नाका, वाकण, माणगाव आदी हमखास वाहतुकीची कोंडी होणाऱ्या ठिकाणांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी वाहनचालक व प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)