Join us  

CoronaVirus News: पॉझिटिव्ह बातमी! कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत असताना मुंबईकरांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 7:07 PM

CoronaVirus News: कोरोना रुग्णवाढीचा दर मंदावला; धारावीत ३० मेपासून एकाही मृत्यूची नोंद नाही

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. पुढच्या काही दिवसांत हा आकडा ५० हजारांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूची लागण होण्याचा वेग मंदावत चालल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरांमधील रुग्ण वाढीचा दरदेखील कमी झाला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर ६.६२ टक्के इतका होता. तो आता ३.५० टक्क्यांवर आला आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमधील रुग्णवाढीचं प्रमाण दहा टक्क्यांवरुन १.६ ते २.४ टक्क्यांवर आलं आहे.  पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांच्या खाली आला आहे. या सहा विभागांमधील रुग्णवाढीचा वेग आधी जास्त होता.मुंबईत मे महिन्यात कोरोनाने थैमान घातलं होतं. मुंबईतील विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत नसल्यानं पालिकेनं अधिक उपाययोजना राबण्यात सुरुवात केली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, सायन, सांताक्रुझ, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्णवाढ कमी होत चालली आहे.सध्या धारावी, दादर, माहिम या भागांतील रुग्णवाढीचा दर २.४ टक्के इतका खाली आला आहे. या भागांत आतापर्यंत मुंबईतील पालिकेच्या सर्व विभागांच्या तुलनेत कोरोनाचे सर्वाधिक ३ हजार २०० रुग्ण सापडले आहेत. पण आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे. प्रभादेवी भागात रुग्णवाढीचा दर २.२ टक्क्यांवर आला आहे. या भागात आतापर्यंत २ हजार २०० रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड विभागातील रुग्णवाढीचा दर अनुक्रमे २.६ टक्क्यांवर, तर कुलाब्यातील रुग्णवाढीचा दर २.७ टक्क्यांवर आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या