Join us  

मुंबई पोलीस होणार गली बॉईज; ई सायकलवरून गल्लीबोळात शिरणार, गुन्हेगारांना पकडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 1:23 PM

लवकरच मुंबई पोलीस सायकवरुन गस्त घालताना दिसणार

मुंबई: गल्लीबोळात शिरून गुन्हेगारांना पकडणं आता मुंबई पोलिसांना शक्य होणार आहे. कारण लवकरच मुंबई पोलीस ई-सायकलचा वापर करणार आहेत. त्यामुळे चारचाकी, दुचाकी जाऊ न शकणाऱ्या भागात जाणं पोलिसांसाठी सोपं होणार आहे. मुंबई पोलिसांना मिळणाऱ्या ई-सायकल बॅटरीवर चालणार आहेत. सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ई-सायकल्सची चाचणी नुकतीच पूर्ण झाली. या सायकलचा वेग प्रतितास 25 किलोमीटर इतका आहे. गस्त घालण्यासाठी पोलीस या सायकल्सचा वापर करतील. एकदा चार्ज केल्यावर ही सायकल तीन तास चालू शकेल. यानंतर ती पुन्हा एकदा तासभर चार्ज करावी लागेल. 'गस्त घालताना पोलीस कर्मचारी ई-सायकलचा वापर साध्या सायकलप्रमाणे करू शकतील. त्यावेळी पँडल मारून सायकल चालवता येईल. ज्यावेळी वेगानं सायकल चालवण्याची गरज असेल, तेव्हा बॅटरीचा वापर करता येईल. त्यामुळे सायकलचा वेग वाढेल,' अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली. 'मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे. अनेक भागातील रस्ते अतिशय लहान आहे. गल्लीबोळात पोहोचून गुन्हेगारांना पकडायचं झाल्यास तिथे दुचाकी नेणं शक्य नाही. अशा भागांमध्ये ई-सायकलच्या मदतीनं पोहोचता येऊ शकतं,' असं सूत्रांनी सांगितलं. सायकल चालवल्यामुळे पोलीस फिट राहतील आणि शहरातलं प्रदूषणही कमी होईल, असं सहआयुक्त देवेन भारतींनी सांगितलं.गेल्या डिसेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी ई-सायकलचा प्रयोग केला होता. गस्त घालण्यासाठी पोलिसांनी ई-सायकलचा वापरल्या. या प्रयोगाला चांगलं यश मिळालं. जगभरात पोलीस गस्त घालण्यासाठी ई-सायकलचा वापर करतात. त्यामुळे अरुंद रस्त्यांवर गुन्हेगारांना पकडताना पोलिसांना फायदा होतो.  

टॅग्स :मुंबई पोलीस