Join us  

शहर सुंदर हाेतंय, पण शेकडाे बेघरांचे काय? निवारा केंद्रांकडे मनपाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:08 AM

सामाजिक संस्थांचा आरोप.

मुंबई :  बेघरांची संख्या मुंबईमध्ये सतत वाढत आहे. यांना सामावून घेण्यासाठी पालिकेची निवारा केंद्रे आहेत खरी, पण तेथील यंत्रणा तोकडी पडत आहे. एकीकडे महापालिका सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, उड्डाणपूल आणि वर्दळीच्या रस्त्यांवर असलेल्या बेघरांच्या वस्त्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप सामाजिक संस्थांकडून होत आहे. 

मुंबईत रेल्वेस्थानकांच्या फलाटावर, रेल्वेस्थानकांच्या बाहेरील पदपथावर, पुलाखाली बेघर वास्तव्यास असतात. मुंबईत लोहार चाळ, चर्नी रोड, मालाड, कुर्ला, दादर, माहीम अशा ठिकाणी बेघरांच्या वस्त्याच दिसतात. रस्त्यावरच सगळे विधी होत असल्यामुळे शहराचे विद्रूपीकरणही वाढते. टाळेबंदीच्या काळानंतर लोकांचा रस्त्यावरील वावर कमी झाल्यानंतर बेघरांचे अस्तित्व अधिकच जाणवू लागले, तर या काळात अनेकांचे रोजगार बुडाल्यामुळे बेघरांच्या संख्येत वाढच झाली. त्यामुळे निवारा केंद्राची सद्य:स्थिती काय आहे, बेघरांची संख्या किती आहे, यावर पालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनकडून करण्यात आली आहे.

१) १२५ निवाऱ्यांची मुंबईत साधारण गरज

२) २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक लाख लोकसंख्येमागे एक निवारा केंद्र बांधण्याचे आदेश

३) ४६,७२५ गेल्या वर्षी महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार बेघर

४) ११ निवारा केंद्रे १८ वर्षे वयाखालील मुलांसाठी 

५) १२ निवारा केंद्रे प्रौढांसाठी कार्यरत

लवकरच २४ वॉर्डांत निवारा केंद्रे...

बेघरांसाठी असलेल्या निवाऱ्यांची संख्या तितक्या गतीने वाढली नाही. मुंबईतील बेघरांना राहण्याचा आसरा मिळावा यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डांत निवारा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उद्योग समूह, कॉर्पोरेट क्षेत्र, बँका सामाजिक संस्थांमार्फत हे शेल्टर होम चालवू शकतील. तसेच, ज्या सामाजिक संस्थांकडे स्वत:ची जागा असल्यास किंवा भाड्याने जागा घेऊन ते चालवावे. त्यांना पालिकेच्या नियमानुसार भाडे दिले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या नियोजन विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका