Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हे भारतीय संस्कृतीचे शहर - महापौर

By admin | Updated: October 25, 2015 03:29 IST

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जगात ओळख आहे. महानगरात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदताना पाहावयास मिळते. त्यासोबतच सर्व प्रांतांचे सण-

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जगात ओळख आहे. महानगरात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदताना पाहावयास मिळते. त्यासोबतच सर्व प्रांतांचे सण-उत्सव मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे मुंबई हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण शहर असल्याचे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी फ्रान्समधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.फ्रान्समधील सुमारे २५ विद्यार्थी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या सौजन्याने १५ दिवसांसाठी मुंबई भेटीवर आले आहेत. ‘भारतीय शिक्षण पद्धती व संस्कृती’ हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय आहे. यानिमित्ताने हे २५ विद्यार्थी व सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे २५ विद्यार्थी अशा एकूण ५० विद्यार्थ्यांनी दादर येथील महापौर निवासस्थानी स्नेहल आंबेकर यांची भेट घेतली.विविध देशांतील नागरिक भारताच्या भेटीला आले की ते मुंबईला आवर्जून भेट देतात. मुंबईचा विकास झपाट्याने होत असून पायाभूत सेवा-सुविधा निर्माण करत असताना गुणवत्तापूर्ण नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे महापौरांनी सांगितले. पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र धरणे आहेत आणि त्यातून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. महिलांचे सक्षमीकरण, युवक, शिक्षण, आरोग्य या विषयांकडे आपले विशेष लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)