Join us  

...म्हणून घोळ मासा ठरतोय मच्छिमारांसाठी लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 9:00 AM

सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण

मनोहर कुंभेजकर

मुंबई : पालघरमधील मुरबे गावातील साई लक्ष्मी बोटीला लागलेल्या घोळ माशाचा बोथ (माशाच्या पोटातील पिशवी) रू. 5,50,000 किंमतीत विकला गेला. तर रत्नागिरी येथे देखील एका खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका मच्छिमाराला घोळ मासे मिळाले होते. गेल्या 1 ऑगस्टपासून मासेमारीच्या नव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच घोळ मासे मिळत असल्यामुळे सध्या मिळणारे घोळ मासे ही तर मच्छिमाराला लागलेली लॉटरी आहे. सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर मत्स्य खवैय्यांसाठी ही एक पर्वणीच ठरत असल्याचे मत रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते यांनी लोकमतशी बोलताना दिली. खास रत्नागिरीवरून या घोळ माशाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

घोळ हा मासा क्रोकर म्हणजे सायानिडी कुळातील माशांत मोडतो. समुद्राच्या पृष्ठभागावर राहणारे हे मासे जलद पोहणारे मासे आहेत. या माशांच्या अन्नमार्गाला एक हवेची पिशवी म्हणजे एअर ब्लॅडर जोडलेले असते. या पिशवीचा आकार गाजरासारखा असतो. या अतिरिक्त श्वसनाच्या अवयवामुळे पाण्याबाहेरही हवा घेऊन ती या पिशवीत साठवता येते. तसेच ही हवा साठवलेली पिशवी माशाला पाण्यात वर  किंवा खाली तरंगण्यास मदत करते. या पिशवीच्या मदतीने हे मासे काही आवाज ही काढू शकतात. 

फिश माँ म्हणूनही या पिशव्या ओळखल्या जातात. घोळ माशाच्या नरांना असणाऱ्या या पिशव्या माद्यांच्या पिशवीपेक्षा जास्त दर्जेदार असतात आणि म्हणून त्यांना चांगला दर मिळतो. ही  पिशवी सुकवून विकल्यास किलोमागे रु. ४०,००० ते ५०,००० मच्छिमाराला मिळू शकतात.   या हवेच्या पिशवीला चीनमध्ये मोठी मागणी असल्याचे ही त्यांनी सांगितले. घोळसारख्या माशांच्या हवेच्या पिशवीचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यांच्यापासून शस्त्रक्रियेत वापरले जाणारे सुचर्स किंवा धागे हे जखम शिवण्यासाठी वापरले जातात. काही कालावधीनंतर हे धागे विरघळून जाऊ शकतात. म्हणूनच चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरला मोठ्या प्रमाणात हे फिश माँ निर्यात केले जातात अशी माहिती त्यांनी दिली.

हवेच्या पिशव्यांचा दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे आयसिंग्लास. बिअर किंवा वाईन बनवण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आयसिंग्लास वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. यामधील सूक्ष्मकण काढून बिअर किंवा वाईन क्रिस्टल क्लियर करण्यासाठी घोळ माशाच्या सुकवलेल्या हवेच्या पिशव्या वापरल्या जातात. कोलॅजेनने बनलेल्या या पिशव्यांचे धागे, बिअर किंवा वाईनमध्ये भिजून अतिशय बारीक आसांची जाळी तयार करतात. त्यात बिअर किंवा वाईन बनवण्यासाठी फेरमेंटेशन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या यीस्टचे अतिसूक्ष्म कण अडकून पडतात. हे वेगळे केले की क्रिस्टल क्लियर बियर किंवा वाईन मिळते. हे सूक्ष्म कण काढून टाकण्यासाठी इतर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली तर ती या पेयांच्या चवीत बदल घडवून, त्याला मारक ठरू शकते. त्यामुळे बहुसंख्य ब्रेव्हरीज आयसिंग्लास वापरणे पसंत  करतात.

प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून या फिश माँला चायनीज मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. चायनीज आहारात समुद्रातून मिळणाऱ्या चार चविष्ट सीफूड्सपैकी एक म्हणजे हे फिश माँ! यात स्निग्ध घटक कमी असतात पण यात ग्लायसिन, प्रोलीन, ग्लुटामिक आम्ल, अलानाईन आणि अर्जिनाईन या अमिनो आम्लांचे प्रमाण जवळ जवळ ६६.२% असते. पारंपरिक शक्तिवर्धक औषध म्हणून या फिश माँचा उपयोग पुरातन काळापासून आशिया खंडात केला जात आहे तो याच मुळे! खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ही या फिश माँचा उपयोग चीनमध्ये केला जातो. कोलॅजेनचा उत्तम स्रोत म्हणून आणि शरीरातील रक्त पुरवठा सुधारण्यासाठी फिश माँपासून खाद्यपदार्थ येथे बनवले जातात. उष्ण वाळूत ते छान स्वच्छ पांढरे होईपर्यंत भाजून किंवा तेलात तळून  आवडीने खाल्ले जातात. फिश माँमध्ये कोणतेही सॉस जाऊन ते छान  स्पॉन्जी होतात. म्हणून  त्यांच्यापासून काही सूप्स ही बनवली जातात. यासाठी सुकवलेली फिश माँ वापरली जातात अशी या घोळ माशाचे महत्व डॉ.स्वप्नजा मोहिते यांनी विषद केले.

घोळ हा फॅटी फिश म्हणजे स्निग्धता असणारा मासा आहे. यातील ओमेगा ३ स्निग्धाम्ल हे हृदयविकारांवर अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या त्वचेपासून जिलेटीन मिळवता येते. एकूणच विचार करता घोळ मासा हा मासेमारांसाठी एक सागरी खजिनाच म्हणता येईल असा  मासा आहे. थव्याने राहणारे हे मासे किनाऱ्याशी खडकाळ भागात पावसाळ्यात अंडी घालायला येतात. जाळ्याने  किंवा किनाऱ्याजवळ गरवून हे मासे पकडले जातात.त्यामुळे सध्या मिळणारे हे मासे खवैय्यांसाठी जशी पर्वणी आहे तशी मच्छि मारांसाठी एक पर्वणीच असल्याचे त्यांनी  सांगितले. 

टॅग्स :मच्छीमारमुंबई