Join us  

क्या बात हैं...! मुंबई तिसऱ्यांदा ठरली जागतिक वृक्षनगरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:17 AM

अन्न आणि कृषी संघटनेकडून मुंबईतील वृक्ष संपदेची दखल.

मुंबई : मुंबई पालिकेकडून पर्यावरण संतुलनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असताना, मुंबईत हरित क्षेत्र वाढावे, हवा शुद्ध राहावी, यासाठी पालिकेने वृक्षलागवड आणि संवर्धनावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईने यंदा सलग तिसऱ्या वर्षी ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावला आहे.  मुंबईत सध्या २९ लाख ७५ हजार झाडे आहेत, तसेच मागील काही वर्षांत नागरी वनीकरण पद्धतीने ५ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. याचाच परिणाम म्हणून जगभरातील हरित शहरांच्या यादीत मुंबईला आपले स्थान बळकट करता आले.

जगभरात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीचे ध्येय उराशी बाळगून अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशन या दोन्ही संस्था २०१९ मध्ये एकत्र आल्या. त्यांनी जगभरात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली. जगभरात वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल या संस्था घेतात. त्यानंतर विविध निकषांवर पात्र ठरणाऱ्या शहरांची जागतिक वृक्ष नगरी यादी घोषित करून त्यांना गौरविण्यात येते. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ‘जागतिक वृक्ष नगरी’चे मानपत्र मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले. जागतिक आर्बर डे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी डॅन लॅम्बे व अन्न आणि कृषी संघटनेच्या वने विभागाचे सहायक संचालक हिरोटो मित्सुगी यांच्या स्वाक्षरी निशी प्रमाणपत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.

‘जागतिक वृक्ष नगरी’चे मानपत्र स्वीकारताना (डावीकडून) अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, आयुक्त भूषण गगराणी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आदी.

...म्हणून केली मुंबईची निवड-

झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, वृक्ष संपदेची अद्ययावत यादी राखणे, अशी मानांकनांची मुंबईने पूर्तता केली आहे. यामुळे सलग तिसऱ्यांदा मुंबईची जागतिक वृक्ष नगरी बहुमानासाठी निवड झाली आहे.

५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय-

संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना ही संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे, तसेच भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे, तसेच मागील सुमारे ५१ वर्षांहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेने वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी केली आहे. २०२७ पर्यंत जगभरात मिळून ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे या फाउंडेशनचे ध्येय आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका