Join us

मुंबई : निवृत्त पोस्ट मास्तरकडून बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:23 IST

एका ९० वर्षाच्या निवृत्त पोस्ट मास्तरकडून गेल्या सहा महिन्यांपासून बालिकेवरवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यात घडली.

मुंबई : एका ९० वर्षाच्या निवृत्त पोस्ट मास्तरकडून गेल्या सहा महिन्यांपासून बालिकेवरवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यात घडली. बंडू सावळा कांबळे असे आरोपीचे नाव असून त्याला पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे.कुर्ला परिसरात १० वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. त्याच परिसरात कांबळे एकमजली घरात राहतो. वरच्या खोलीत मुलगा, सून आणि नातवंडे राहतात. तर खालच्या खोलीत कांबळे एकटाच राहत असे. रंगपंचमीच्या दिवशी कांबळेने पीडित मुलीला घरी बोलावले. तो वृद्ध असल्याने त्याला मदत म्हणून मुलगी घरी गेली. तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास बदनामीची धमकी दिली. मुलीच्या शांततेचा फायदा घेत कांबळे तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता.सोमवारी त्याने मुलीला घरी बोलावले. ती घाबरलेल्या अवस्थेत घरी आलेली पाहून आईने तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने कांबळेच्या विकृतीला वाचा फोडली. आईने याबाबत विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी कदम यांनी तपास सुरु केला आणि कांबळेला बेड्या ठोकल्या आहेत. कांबळेने अशाप्रकारे चाळीतील अन्य मुलींसोबतही अश्लील चाळे केल्याचा संशय पोलिसांना आहे.