Join us

मुंबईत भाजपा-आठवले साथ, साथ

By admin | Updated: February 3, 2017 21:44 IST

25 वर्षांपासूनची साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली असली तरी

मुंबई, दि. 3 -  25 वर्षांपासूनची साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली असली तरी  मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी  महायुतीतील इतर  मित्रपक्ष मात्र भाजपासोबत उभे राहिले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइंसह, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपासोबत मिळून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. 
आज दुपारी भाजपा, रिपब्लिकन पार्टी आणि रासपच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा केली. तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागावाटपाच्या वाटाघाटींनुसार रिपब्लिकन पार्टीला 25, रासपला 5 आणि शिवसंग्रामला चार जागा देण्यात आल्या आहेत. तर भाजपा 195 जागा लढवणार आहे. 
दरम्यान, युतीची घोषणा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  यांनी जागावाटप करताना झालेल्या वाटाघाटींनुसार सत्ता आल्यावर मुंबईत भाजपाचा महापौर तर रिपाइंचा उपमहापौर असेल, असे सांगितले. मात्र मुंबईत भाजपा आणि रिपाइं यांच्यात युती झाली असली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांमधील युती तुटली आहे. भाजपाने अगदीच कमी जागा देऊ केल्याने रिपाइंच्या स्थानिक नेत्यांना युती तोडली आहे.