Join us

मुंबई विमानतळाचे डोमॅस्टिक टर्मिनल आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:06 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सर्व विमानांचे ‘टी २’वरून उड्डाणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विमानतळाचे डोमॅस्टिक टर्मिनल (टी १) ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सर्व विमानांचे ‘टी २’वरून उड्डाण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळाचे डोमॅस्टिक टर्मिनल (टी १) आजपासून प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबईतील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उड्डाणे (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) टर्मिनल २ वरून होणार आहेत.

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल - १ वरून देशांतर्गत, तर टर्मिनल- २ वरून आंतराष्ट्रीय आणि काही देशांतर्गत विमानांचे उड्डाण होते. मे महिन्यात हवाई प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर केवळ टर्मिनल - २ वरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यापासून प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येऊ लागल्याने तब्बल वर्षभरानंतर १० मार्च रोजी टर्मिनल- १ खुले करण्यात आले. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे डोमॅस्टिक टर्मिनल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या विमानतळ प्रशासनाला दोन्ही टर्मिनल खुली ठेवून त्यांची व्यवस्था पाहणे शक्य होणार नाही. शिवाय एकच टर्मिनल खुले असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून कोरोना प्रतिबंधक नियमांची कोटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोपे जाईल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

* प्रवाशांसाठी सूचना

यापुढील काही दिवस सर्व विमानांचे उड्डाण टर्मिनल २ वरून होणार आहे. त्यामुळे गोएअर, स्टार एअर, एअर एशिया, ट्रूजेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांचे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनी संबंधितांशी संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची वेळ, ठिकाण याबाबत खातरजमा करून घ्यावी. टर्मिनल बदलामुळे प्रवाशांना अडचण आल्यास पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मुंबई विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.

........................................