Join us  

मुंबई विमानतळावर अखेर 'महाराज' हा शब्द लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 9:48 AM

फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ अशी अखेर शुक्रवारी  (2 नोव्हेंबर) नामकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन्ही विमानतळांची जगाला ओळख झाली आहे.

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराजमुंबईविमानतळ अशी अखेर शुक्रवारी  (2 नोव्हेंबर) नामकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन्ही विमानतळांची जगाला ओळख झाली आहे. जिव्हीके कंपनीने या दोन्ही  विमानतळाच्या प्रवेशद्वारावर अखेर तब्बल दोन महिन्यानंतर महाराज ही उपाधी निर्देशित केली आहे अशी माहिती वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी लोकमतशी बोलताना दिली. महाराज या उपाधीसाठी 28 वर्षाच्या आपल्या लढ्याला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी ऑगस्ट रोजी सायंकाळी ट्विट करत मुंबईच्या दोन्ही विमानतळावर अखेर महाराज शब्द निर्देशित करण्यात येईल अशी  माहिती दिली होती. ‘महाराष्ट्रातील जनतेचे मी अभिनंदन करत असून त्यांची अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो,’ असेही त्यांनी म्हटले आहे.  ही घटना मुंबईकर व देशवासीयांना अभिमान वाटावा असे खासदार गोपाळ शेट्टी  म्हटले असून आपण महाराज या उपाधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता अशी माहिती त्यांनी दिली.

विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नव्हती. लोकमतने गेली अनेक वर्षे याबाबत तब्बल 40 वेळा आवाज उठवला होता. 1990 पासून महाराज ही उपाधी निर्देशित करण्यासाठी वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी देखील प्रयत्न केले होते. लोकमत समूहाचे त्यांनी आभार मानले. तर खासदार गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: शिवप्रेमी आहेत. 2014 च्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधानांनी रायगड किल्ल्यावर जाऊन नारळ फोडून केला होता. महाराज ही उपाधी या दोन्ही विमानतळांच्या नामकरणात निर्देशित करण्यासाठी शिवप्रेमी म्हणून आपण स्वत: पंतप्रधान व प्रभू यांच्याकडे आवाज उठवला होता आणि अखेर ही मागणी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 800  शिवसैनिकांनी व महिला आघाडीने गेल्या 8 ऑगस्ट रोजी महाराज या उपाधीसाठी गनिमी कावा करत सांताक्रुझ पूर्व येथील आंतरदेशीय गनिमी कावा करत विमानतळावर आंदोलन केले होते. महाराज उपाधी लागण्याचे श्रेय सेनेचे असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे नामकरणाचे श्रेय हे शिवसेनेचे आहे असा दावा 84 चे शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी लोकमतशी बोलताना केला.

टॅग्स :मुंबईविमानतळछत्रपती शिवाजी महाराज