Join us  

मुंबई विमानतळावरील ‘इंधनतळ’ धोक्यात; सुरक्षारक्षक असूनही अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 2:29 AM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधनांच्या टाक्यांपर्यंत जाणाऱ्या आगंतुकांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने या परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे.

- खलील गिरकरमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधनांच्या टाक्यांपर्यंत जाणाऱ्या आगंतुकांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने या परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. या टाक्यांमधूनच विमानांना इंधन पुरविले जाते. कोणत्याही तपासणीविना व चौकशीविना थेट ‘आॅपरेशनल एरिया’पर्यंत जाणे कुणालाही सहज शक्य होत असल्याने, या ठिकाणच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.मुंबई एव्हिएशन फ्युएल फार्म फॅसिलिटी, इंडियन आॅईल स्काय टॅकिंग, भारत स्टार या कंपनीद्वारे विमानतळावरील विमानांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम केले जाते. विलेपार्ले येथील टर्मिनल एकजवळ असलेल्या हवाई नियंत्रण कक्षाजवळील भागात या टाक्या आहेत. लाखो लीटर इंधन साठवून ठेवलेल्या ३ टाक्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे आगंतुक व्यक्तींना या ठिकाणी आतमध्ये जाण्यास प्रतिबंध आहे. मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आत जाण्यापूर्वी तपासणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, एखादा ज्वलनशील पदार्थ आत घेऊन गेल्यास मोठा अपघात होण्याची भीती असते.मात्र, या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही त्यामध्ये हलगर्जीपणा केला जात असल्याचे समोर आले आहे. सीआयएसएफ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान या ठिकाणी तपासणीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र, सदर प्रतिनिधी आतमध्ये जाऊन, पूर्ण विभागात फिरून आल्यावरदेखील कोणत्याही प्रकारची तपासणी किंवा चौकशी केली नाही. इंधन असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे आगंतुक जाणे हे धोकादायक असल्याने हा सुरक्षेमधील हलगर्जीपणा म्हणावा लागेल.सुरक्षा यंत्रणांकडून हलगर्जीज्या ठिकाणी इंधनाच्या टाक्या आहेत, तो विभाग ‘आॅपरेशनल एरिया’ म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी जाण्यापूर्वी रजिस्टरमध्ये नोंद करून संबंधित अधिकाºयांची पूर्वपरवानगी घेऊन जाणे आवश्यक असताना, आतमधील विभागात सुरक्षा यंत्रणांकडून हलगर्जीपणा झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. या ठिकाणी काम करणाºया व्यक्तींना विशेष गणवेश आहे, त्यामुळे बाहेरील व्यक्ती लगेच ओळखता येणे शक्य असते. मात्र, तरीही या परिसरात फेरफटका मारल्यानंतर कोणीही दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शनिवार व रविवारी कार्यालय बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

टॅग्स :मुंबईविमानतळ