Join us  

मुंबई विमानतळावरुन, लॉकडाऊन कालावधीत 5200 टन निर्यात व 3324 टन आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 6:51 PM

विमानतळावरुन देशात व परदेशात हवाई मार्ग मालवाहतूक सुरु आहे.

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशात व परदेशात हवाई मार्ग मालवाहतूक सुरु आहे. या माध्यमातून 23 मार्च पासून सुमारे 5200 टन निर्यात व 3324 टन आयात करण्यात आली.  

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवर बंदी लादण्यात आली आहे. ही बंदी 3 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुन करण्यात आलेल्या हवाई मालवाहतुकीद्वारे देशात विविध ठिकाणी व परदेशात अत्यावश्यक वस्तु, औषधे,  वैद्यकीय उपकरणे, इंजिनिअरींग वस्तू, केमिकल्स, फार्मास्युटिकल्स अशा विविध प्रकारातील वस्तुंची आयात व निर्यात करण्यात आली आहे. त्यामध्ये आयातीचे प्रमाण 3324 टन तर निर्यातीचे प्रमाण 5200 टन आहे.  सध्या विमानतळावरुन दररोज सरासरी 8 ते 9 मालवाहू विमानांची वाहतूक होत आहे. देशातील सप्लाय चेन अबाधित ठेवण्यासाठी सध्या हवाई मालवाहतुकीवर मोठी जबाबदारी आली आहे. अमेरिका,  जर्मनी,  दक्षिण अफ्रिका,  फ्रान्स, इंग्लंड,  या देशांमध्ये निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. 3788 टन फार्मा उत्पादनांची वाहतूक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळ देशातील फार्मा उत्पादनांची वाहतूक करणारे प्रथम क्रमाकांचे विमानतळ आहे. 

सध्याच्या अडचणीच्या काळात मुंबई विमानतळाने एका दिवसात सर्वात जास्त आयात व निर्यात करण्याचा विक्रम केला आहे. एकाच दिवसात 707 टन निर्यात व 286 टन आयात करण्याचा विक्रम विमानतळाने केला आहे.  कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी येत असलेले सर्व अडथळे व समस्या बाजूला सारुन कर्मचारी चौवीस तास कार्गो व्यवस्थापन करण्यात व्यस्त आहेत. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांसाठी पास उपलब्ध करुन देण्यात आले असून बेस्टच्या माध्यमातून विशेष सेवा पुरवण्यात आली आहे.  कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेण्यात येत असून त्यांना मास्क, सँनिटायझर्स व हातमोजे पुरवण्यात आले आहेत.  सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जात असून , कार्गो परिसराचे नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

टॅग्स :विमानतळकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या