Join us

मुंबईत ६४ टक्के कोरोना बळी ज्येष्ठ नागरिक गटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:07 IST

देशाच्या तुलनेत प्रमाण अधिक : आतापर्यंत ७०४६ जणांनी गमावला जीवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संक्रमणामुळे देशभरात जीव ...

देशाच्या तुलनेत प्रमाण अधिक : आतापर्यंत ७०४६ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संक्रमणामुळे देशभरात जीव गमावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५३ टक्के प्रमाण हे ज्येष्ठ नागरिक गटातील असल्याचे दिसून आले. मात्र देशाच्या तुलनेत राज्य आणि मुंबईत हे प्रमाण अधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबईत ६० वयोगटातील ६४ टक्के व्यक्तींनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण ११ टक्क्यांनी अधिक आहे. तर राज्यात हे प्रमाण ५८ टक्के आहे.

मुंबई शहर, उपनगरात आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे ११ हजार १७ रुग्णांचा मृत्यू झाला, यात ७ हजारांहून अधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिक गटातील आहेत. तर राज्यातील एकूण ४८ हजार मृत्यूंमध्ये २७ हजार ५०० ज्येष्ठ नागरिक कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. ज्येष्ठ नागरिक गटातील सर्वाधिक कोरोना मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी या गटाचा प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसह दुसऱ्या बाजूला या गटाच्या लसीकरणाचा कृती आराखडाही शासनाने युद्धपातळीवर राबवावा असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

* अतिजाेखमीचे आजार हे मुख्य कारण

कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरिक रुग्णांचा सर्वाधिक बळी जाण्यामागे अतिजोखमीचे आजार हे मुख्य कारण आहे. शहर, उपनगरात ३० टक्के उच्च रक्तदाब आणि १५ टक्के मधुमेहाचे रुग्ण आहेत. शिवाय, कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांचे निदान लवकर झाले तरी उपचार प्रक्रियेला विलंब हाेत असे. शिवाय रुग्णालाही उपचार प्रक्रियेचा मानसिक ताण, भीती असायची. परिणामी, प्रकृतीत अधिक गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू ओढावल्याची अनेक उदाहरणे आहेत.

* मुंबईतील काेराेना रुग्णांचा आढावा

वयोगट रुग्ण मृत्यू

१ ते १९ १५,९२४ ४८

२० ते ४९ १,४१,८५६ १५१३

५० ते ५९ ५५,२१६ २४१०

६० वर्षांहून अधिक६७,८१६ ७०४६

...........................