Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बहुमजली पार्किंग

By admin | Updated: July 18, 2015 23:52 IST

महापालिकेने आता शहरातील होणारी वाहतूककोंडी आणि बेकायदा पार्किंग समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात भविष्यात विविध प्रयोजनांसाठी मोकळ्या असलेल्या

- अजित मांडके,  ठाणे महापालिकेने आता शहरातील होणारी वाहतूककोंडी आणि बेकायदा पार्किंग समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात भविष्यात विविध प्रयोजनांसाठी मोकळ्या असलेल्या आरक्षित भूखंडांवर भूमिगत आणि बहुमजली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार, शहरात असलेल्या १२८ आरक्षित भूखंडांपैकी ८८ भूखंडांवर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सर्व्हे सुरू केला आहे. याशिवाय, शहरातील विविध ठिकाणी बहुमजली अर्थात मल्टिलेव्हल पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात जांभळी नाका येथील सेंट जॉन स्कूलजवळील रस्त्यावर तीन मजली पार्किंग प्लाझा उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच ४० मैदानांचीही दुरुस्ती करून ती खेळांसाठी मोकळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरात १५ लाखांवर वाहनांची संख्या असून यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आहे. परंतु, शहरात एकाही ठिकाणी पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त पार्किंग होत आहे. यावर वाहतूक पोलीस आणि पालिकेकडून कारवाईसुद्धा होते. काही ठिकाणचे सर्व्हिस रस्ते हे अशाच बेकायदा पार्किंगसाठी आंदण दिल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे ऐन गर्दीच्या वेळेस वाहतूककोंडी होत आहे. त्यातच पालिकेने आणलेले पार्किंग धोरणही अद्याप कागदावर असल्याने शहरात ही समस्या वाढत आहे. दरम्यान, आता स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, या उद्देशाने शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, जे आरक्षित भूखंड आहेत, त्यांची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रत्येक प्रभाग समितीत असे किती स्पॉट आहेत, याचा सर्व्हे सुरू करण्यात येत आहे. दुसरीकडे १२८ आरक्षित भूखंड असून त्यात ४० मैदानांचा समावेश आहे. त्यांची दुरुस्ती करून खेळांसाठी त्यांचे प्रयोजन करण्याचा सल्ला महापौर संजय मोरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच उर्वरित ८८ ठिकाणी अशा प्रकारे पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊ शकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षित भूखंडांबरोबरच आता शहरातील विविध महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा सुरू करण्याचा विचार पालिकेने केला असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात सेंट जॉन स्कूल येथे तीन मजली पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार असून येथे चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गावदेवी मैदानाखाली पूर्वी दुमजली अंडरग्राउंड पार्किंग सुरू करण्याचा विचार पालिकेने केला होता. आता त्या ठिकाणी एक मजली पार्किंग सुविधा सुरू करण्यात येणार असून येथे चारचाकी वाहने पार्क केली जाणार आहेत. जांभळी नाक्याजवळील महात्मा गांधी उद्यानाच्या खालीसुद्धा अशा प्रकारची पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी एक मजली पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार असून येथे दुचाकी वाहनांसाठी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.आॅफ रोड पार्किंग...पार्किंगची आणखी एक नवी संकल्पना आयुक्तांंनी पुढे आणली आहे. रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला अथवा इतर काही ठिकाणे उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी आॅफ रोड पार्किंगची म्हणजेच रात्रीच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, ही सुविधा केवळ रात्रीच्या वेळेसच उपलब्ध असणार आहे. बहुमजली, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवरील आणि आॅफ रोड पार्किंगचे दर कसे असावेत, किती असावेत, याचा अभ्यास करून त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या या आरक्षित भूखंडांवर अद्याप कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, भविष्यात ते घडू नये आणि पालिकेच्या भूखंडांचे रक्षण व्हावे, या उद्देशानेही पार्किंगची संकल्पना पुढे आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.