Join us

ठाणे राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी मुल्ला

By admin | Updated: July 4, 2015 23:35 IST

अखेर चार महिन्यांनंतर ठाणे राष्ट्रवादीला नजीब मुल्ला यांच्या रुपाने शहराध्यक्ष लाभले आहेत. तर शहर कार्याध्यक्षपदी संजय भोईर यांची निवड झाली आहे.

ठाणे : अखेर चार महिन्यांनंतर ठाणे राष्ट्रवादीला नजीब मुल्ला यांच्या रुपाने शहराध्यक्ष लाभले आहेत. तर शहर कार्याध्यक्षपदी संजय भोईर यांची निवड झाली आहे. या पदावर कब्जा मिळविण्यासाठी ठाण्यात आव्हाड आणि डावखरे गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर, ठाणे शहर राष्ट्रवादीवर पुन्हा आव्हाड गटानेच वर्चस्व कायम राखले आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचे गटातटांचे राजकारण नसून ते एक कुटुंब असल्याचा दावा नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी केला असला तरी कार्याध्यक्षपद मिळालेल्या संजय भोईर यांनी मात्र निवडीवर नाराजी व्यक्त करून ते न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कुटुंबात दरी पडली आहे.ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पक्षांतर्गत निवडणुका न घेतल्याचा ठपका ठेवून त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. परंतु, त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली होती. त्यानंतर निरंजन डावखरे, नजीब मुल्ला, संजय भोईर, हणमंत जगदाळे यांच्या समितीकडे अध्यक्षाची निवड करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, तिने ही निवड करण्यास बराच कालावधी घेतल्याने राष्ट्रवादीत नाराजी होती. तर, या समितीमधील निरंजन डावखरे, संजय भोईर, हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला यांच्यासह देवराम भोईर आणि अशोक राऊळ हे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते. अखेर, या सर्वांवर मात करून मुल्ला यांनी हे अध्यक्षपद पटकावले, तर संजय भोईर यांची कार्याध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली. नवनिर्वाचित शहराध्यक्ष मुल्ला यांनी सांगितले की, शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी आणखी आक्रमक होणार आहे. राष्ट्रवादी हे एक कुटुंब असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, भोईर यांनी हे पद घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मला विरोधी पक्षनेतेपदाची कमिटमेंट देण्यात आली होती. ती पाळली न गेल्याने मी हे पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.