Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री शक्तीपुढे नमले प्रशासन

By admin | Updated: November 12, 2014 22:38 IST

रायगड जिल्हय़ातील अंगणवाडी महिला कर्मचा:यांच्या मागण्या मान्य करीत, ज्या सेविकांचा अपमान झाला आहे, त्यांची माफी अखेर जिल्हा प्रशासनाने मागितली.

अलिबाग : रायगड जिल्हय़ातील अंगणवाडी महिला कर्मचा:यांच्या मागण्या मान्य करीत, ज्या सेविकांचा अपमान झाला आहे, त्यांची माफी अखेर जिल्हा प्रशासनाने मागितली.  
आपल्या विविध मागण्यांसाठी आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध करण्यासाठी जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचा:यांनी बुधवारी रायगडच्या जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कॉ. माया परमेश्र्वर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
एसटी स्टॅण्डपासून सुरु झालेल्या मोर्चाला पोलिसांनी सार्वजनिक वाचनालयाजवळ रोखले. तेथेच मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर एक शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता ते उपस्थित नव्हते. पाटील यांना भेटल्याशिवाय परत जाणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळाने केला आणि पाटील यांच्या केबिनबाहेरच ठिय्या मांडला. त्यानंतर सुमारे दोन तासानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील आले. त्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. हक्काचे मानधन देण्यात जिल्हा परिषद प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचा:यांची दिवाळी अंधारात गेली. 21 ऑक्टोबरला रक्कम जमा होऊनही ती देण्यात प्रशासनाने टाळाटाळ केली, याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्यांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव यांनी अपशब्द वापरुन अपमानास्पद वागणूक दिली होती. त्याचा निषेध करण्यासाठी नारी शक्ती रस्त्यावर उतरली आहे, असे माया परमेश्र्वर यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यापुढे महिलांना सन्मानाची वागणूक देण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)
 
4महिलांना सन्मानजनक वागणूक देण्यात येईल, तसेच यापुढे मानधनाच्या रकमा वेळेतच मिळण्याची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे तुमचे आंदोलन थांबवावे अशी विनंती शिष्टमंडळाला मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी केली. त्यानंतर उपमुख्यकार्यकारी अधिकारी यादव यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन महिलांची माफी मागितली.