ठाणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य सचिवपदावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांना घेण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र इलेक्ट्रिीकल इंजिनिअर्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़राज्य लोकसेवा आयोगातून अधिकारी बाहेर पडतात़ राज्य प्रशासनाच्या दृष्टीने लोकसेवा आयोग ही संवेदनशील अशी संस्था असून तिच्यामार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन अधिकाऱ्यांची पात्रता ठरविण्यात येते़ अशा संस्थेच्या सदस्य सचिवपदावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांना घेण्याचे घाटत आहे़ मात्र, त्यांच्यावर अनेक आरोप असून औरंगाबाद येथे असताना त्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यास लोकसेवा आयोगावर घेतल्यास सरकारची प्रतिमा काळवंडू शकते़ राज्यात अनेक गुणवंत सनदी अधिकारी असून त्यांच्यातील कुणाही एकाची या पदावर नियुक्ती करावी, असे संघटनेचे अध्यक्ष गणेश ढोकळे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे़ (खास प्रतिनिधी)मुखर्जी यांच्या सारख्या अधिकाऱ्यास लोकसेवा आयोगावर घेतल्यास राज्याच्या प्रशासनात गुणवत्तेशिवाय फक्त ‘जुगाडी’ अन ‘लक्ष्मी’ पुत्रांची निवड होऊ शकते़ आधीच सामाजिक विषमता वाढली आहे. गुणवंताना डावलण्यात येऊ शकते़ यामुळे त्यांच्याऐवजी राज्य प्रशासनातील अन्य हुशार व निष्कलंक अधिकाऱ्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य सचिवपदावर नियुक्ती करावी.- गणेश ढोकळे-पाटील, अध्यक्ष इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशन
मुखर्जींना लोकसेवा आयोगावर घेऊ नये!
By admin | Updated: March 4, 2015 02:02 IST