मुंबई : उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत नवीन लोकल आणण्यासाठी रेल्वेची धडपड सुरू असून अद्यापही बम्बार्डियर या नवीन लोकलला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येते. २६ जानेवारीला नवीन लोकल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न होता. मात्र आता हा प्रयत्नही फसला आहे. एमआरव्हीसीमार्फत बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांसाठी येणार आहेत. या ७२ पैकी दोन लोकल २०१३ च्या आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्या. या दोन्ही लोकलची रेल्वे अधिकाऱ्यांकडून चाचणी घेतल्यानंतर पश्चिम रेल्वेवर २0१४ च्या मार्च, एप्रिल, मे, जुलै, सप्टेंबर, आॅक्टोबर, जानेवारी महिन्यात सुरू करण्यास मुहूर्त निवडले. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे त्याचा मुहूर्त पुढे ढकलला. अखेर रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी चर्चगेट ते बोरीवली जलद आणि बोरीवली ते चर्चगेट धिम्या मार्गावर बम्बार्डियर लोकलची नुकतीच चाचणी घेतली. यात वेग, प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील गॅप आणि अन्य तांत्रिक चाचण्यांची माहितीही घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगत हिरवा कंदीलही दिला. मात्र रेल्वे बोर्डाकडून काही मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल येणे बाकी असून ते आल्यानंतर या चाचणीचा अखेरचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे. या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून २६ जानेवारीपर्यंत बम्बार्डियर लोकल सुरू करण्याचा एमआरव्हीसीचा प्रयत्नही होता. ही लोकल या दिवशी धावेल, असे संकेतही एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी दिले होते. (प्रतिनिधी)
बम्बार्डियर ट्रेनचा ‘मुहूर्त’ पुन्हा टळला
By admin | Updated: January 28, 2015 01:33 IST