मुंबई : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील चौपाट्यांचा विकास करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घेतला आहे. प्रथम वर्सोवा चौपाटीचा विकास केला जाईल. त्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनची (सीआरझेड) मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी एमटीडीसीने गेल्या आठवड्यातच प्रस्तावही सादर केला आहे. मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र मुंबईतील चौपाट्यांवर आल्यानंतर त्यांची निराशाच होते. हे टाळण्यासाठी वर्सोवा, जुहू आणि गिरगाव चौपाटीचा विकास केला जाणार आहे. या चौपाट्यांवर मरीना (बोट पार्किंग), पर्यटकांसाठी शॉवर आणि टॉयलेट, पक्षीसंग्रहालय, अॅम्फी थिएटर (प्रेक्षागृह किंवा नाट्यगृह), कॅफेटेरिया, वाहनांसाठी पार्किंग उभारण्यात येणार आहे. तसेच साहसी खेळही चौपाट्यांवर उपलब्ध केले जातील. विविध प्रकारच्या बोटींतून फिरता येईल. तीनही चौपाट्यांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकास केला जाणार आहे. वर्सोवा चौपाटीच्या विकासासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे एमटीडीसीचे साहसी क्रीडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी सांगितले. सल्लागार कंपनी म्हणून पी. के. दास असोसिएट्सची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सीआरझेड मंजुरीसाठी एमटीडीसीचा प्रस्ताव
By admin | Updated: August 1, 2015 03:44 IST