Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासदाराच्या मुलाला लुटले

By admin | Updated: August 19, 2015 01:27 IST

उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील खासदारच्या मुलाला ‘एस्कोर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या एका महिलेने तिच्या चालकाच्या मदतीने चाकूचा धाक दाखवत लुबाडले

मुंबई : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील खासदारच्या मुलाला ‘एस्कोर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या एका महिलेने तिच्या चालकाच्या मदतीने चाकूचा धाक दाखवत लुबाडले. ही घटना सांताकू्रझच्या कालिना परिसरात एका पंचतारांकित हॉटेलसमोर घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संबंधितांनी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना फोन केल्यानंतर वाकोला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेहेरसिंग कुवरसिंग तन्वर यांचा ४० वर्षीय मुलगा हा बिझनेसच्या निमित्ताने रविवारी मुंबईत कालिनातील एका मित्रासोबत उतरला होता. त्यावेळी त्याने ‘एस्कोर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या एका महिलेला फोन केला आणि तिला संबंधित हॉटेलच्या बाहेर बोलावले. त्यानुसार एक महिला तिच्या चालकासोबत या ठिकाणी आली. तन्वर या ठिकाणी पोहोचला, तेव्हा त्याच्या पोटावर सुरा रोखून त्याच्याकडे असलेली दीड लाखांची रोख रक्कम त्यांनी लंपास करीत दोघे घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि ३९७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, शोध सुरू असल्याची माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’ला दिली. हॉटेलजवळील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्याचे कामदेखील सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)