Join us

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या नियोजनासाठी पालिकेकडून हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली, येत्या १ मार्चपासून ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. सरकारी रुग्णालयांत ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने याची तयारी सुरू असून केंद्राकडून योग्य सूचना आल्या नसल्याने लसीकरण प्रक्रियेला अधिक कालावधी लागेल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबईत १६ जानेवारीला लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत १ लाख ९९ हजार ९१२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात १ लाख ८६ हजार १५८ आरोग्य कर्मचारी तर १३ हजार ७५४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात सर्वसामान्यांना लस देण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मार्च महिन्यात सुरू होणार असले तरी याविषयी केंद्र सरकारकडून कोणत्याही स्वरूपाचे अधिकृत मार्गदर्शन मिळालेले नाही. यामुळे लसीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, ‘को-विन’ या ॲपचा एकाच वेळी वापर होत असल्याने त्यावर लोड येण्याची शक्यता आहे. परिणामी, लसीकरण प्रक्रियेतील अडथळ्यांचा केंद्र शासनाने विचार करणे गरजेचे आहे.

असोसिएशन ऑफ हाॅस्पिटलचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले, मुंबईत आता खासगी रुग्णालयांत लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठीही खासगी रुग्णालयांची तयारी असून, त्याविषयी पालिका प्रशासनाचे निकष पूर्ण करण्यास रुग्णालयांनी तयारी दाखविली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रिया अधिकाधिक सुरळीत होण्यासाठी कोरोनाविषयक मार्गदर्शक नियमांचेही पालन करण्यात येणार आहे.