Join us

केईएम रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह परिचारिकेसह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 06:37 IST

कर्मचाऱ्यांवर केईएममध्येच उपचार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  केईएम रुग्णालयाच्या पारिचारिकांनी सोमवारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. केईएमच्या कर्मचारी असलेल्या कोरोनाबाधित परिचारिकांवर रुग्णालयातच उपचाराची व्यवस्था करावी, अशी मागणी परिचारिका गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने याच्या निषेधार्थ त्यांनी कोरोनाबाधिक परिचारिकेसह आंदोलन पुकारले होते.

केईएम रुग्णालयातील ४५ परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या परिचारिकांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात व्यवस्था नाही. त्यांना महात्मा गांधी रुग्णालय किंवा सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविले जाते. त्यांच्यावर केईएममध्येच उपचार व्हावेत, अशी मागणी परिचारिकांनी केली होती.

सातत्याने मागणी करूनही त्याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिचारिकांनी कोरोनाची लागण झालेल्या परिचरिकेला घेऊन रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या वेळी परिचारिकांच्या उपचारासाठी वेगळा कक्ष बनविण्याचे आश्वासन अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी दिले.