Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाड पूर्व येथील अनावश्यक स्कायवॉकच्या विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:08 IST

मुंबई : मालाड स्टेशन पूर्व ते पुष्पा पार्क हायवे दरम्यान स्कायवॉक बांधून लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. हा ...

मुंबई : मालाड स्टेशन पूर्व ते पुष्पा पार्क हायवे दरम्यान स्कायवॉक बांधून लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. हा मार्ग अत्यंत गजबजलेला, अरुंद आणि प्रचंड वाहतुकीचा, रहदारीचा आणि वळणाचा आहे. या रस्त्यावरील पादचारी, ऑटो रिक्षा, फेरीवाले, वाहनांचे पार्किंग अशा नाना अडचणी येथील दुकानदारांना आहेतच, त्यात या नवीन अडचणीची भर पडणार आहे. मालाड पूर्व येथील व्यापारी आणि जनतेने निर्धाराने कडकडीत बंद पाळून येथील स्कायवॉकविरोधात नुकताच आपला निषेध व्यक्त केला.

येथील सर्व व्यापारी आणि जनतेने उस्फूर्तपणे शांतीपूर्वक निदर्शने केली. मालाड पूर्व येथील व्यापारी आपापली दुकाने बंद ठेवून निदर्शनात सामील झाले होते.

सरकारी कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, हा स्कायवॉक कांदिवली पश्चिमकरिता मंजूर झालेला होता, परंतु तेथील जनतेच्या विरोधानंतर हा स्कायवॉक मालाड पूर्वेला आणला गेला. कोणाच्या फायद्यासाठी मालाडवासी जनतेच्या माथी हा स्कायवाॅक मारला जात आहे, असा प्रश्न येथील प्रवीण मालोडकर यांनी प्रशासनाला विचारला आहे.

इतरत्र बांधलेल्या स्कायवॉकचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की, त्या स्कायवॉकचा उपयोग आणि फायदा केवळ लव्हबर्ड्सना प्रेमाचे चाळे करण्याचे ठिकाण, भिकारी - गर्दुल्ले यांचे विश्रातीस्थान असाच झालेला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा उपयोग लोकोपयोगी कामासाठीच व्हायला हवा. जसे की शाळा, हॉस्पिटल वगैरे, असा मालाडवासीयांचा उद्देश आणि विचार आहे, अशी भूमिका येथील व्यापाऱ्यांनी मांडली.

जनतेच्या करामधून मिळणाऱ्या पैशांचा जर का असा दुरुपयोग होणार असेल तर मालाडमधील जागरुक नागरिक नक्कीच आंदोलन करतील, असा इशारा येथील लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांना येथील व्यापारी आणि नागरिकांनी दिला आहे.

येथील आंदोलनात जनता वेफर्सचे मालक जनक ठक्कर, राजीव शुक्ल, नामदेव झिंगाडे, रामदास दांडेकर आदी व्यापारी तसेच आनंद आल्हाट, महेश फरकासे, संतोष धनावडे, वैभव मालणकर, मिलिंद रेपे, नरेंद्र मदन, प्रवीण मालोडकर असे सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी प्रचंड संख्येने सामील झाले होते. यावेळी मालाड पोलीस स्थानकाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.