Join us

पवई तलावाच्या आत होत असलेल्या बेकायदेशीर सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

मुंबई : पवई तलावाच्या आत होत असलेल्या बेकायदेशीर सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी स्थानिक तसेच यूथ फॉर आरे फाउंडेशनने ...

मुंबई : पवई तलावाच्या आत होत असलेल्या बेकायदेशीर सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी स्थानिक तसेच यूथ फॉर आरे फाउंडेशनने प्रतीकात्मक आंदोलन केले.

पवई तलाव, आजूबाजूला संवेदनशील जैवविविधता, मगरी आहेत. या सायकल ट्रॅक प्रकल्पामुळे जैवविविधता धोक्यात येईल, असे स्थानिक लोकांचं तसेच पर्यावरणप्रेमींच मत आहे.

पवई तलाव हा सर्वात जुना तलाव आहे. आजूबाजूला अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. पहिल्यांदाच तलावामध्ये भराव टाकण्याचे काम सुरू आहे. नवा सायकल ट्रॅक करण्याचा सरकारचा मानस असल्या कारणामुळे जैवविविधतेला धोका पोहचू शकतो, असे काही पर्यावरणप्रेमींना वाटते यासाठी स्थानिकांनी प्रतीकात्मक आंदोलन केले.

यूथ फॉर आरेचे संस्थापक अध्यक्ष निशांत बगेरा म्हणाले की, जो हा प्रकल्प सध्या महानगरपालिका बांधत आहे, त्या प्रकल्पाचे काम थांबवावं कारण पवई तलावाच्या आजूबाजूला जैवविविधता तसेच मगरी आहेत, तर या प्रकल्पामुळे त्यांना धोका पोहचू शकतो. म्हणून हे काम थांबवण्यासाठी आम्ही पालिकेशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. जर हे काम थांबवले गेले नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक ओमकार सुपेकर म्हणाले की, पवई तलावाबाबत मी सध्या ४० ते ५० दिवसांपासून पाठपुरावा करत आहोत. या संदर्भात मी महानगरपालिका तसेच सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. महानगरपालिकेने स्थानिक लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. पालिकेने स्थानिक लोकांशी कोणतीही चर्चा केली नाही. जोपर्यंत स्थानिक लोकांशी चर्चा होत नाही तोपर्यंत पालिकेने काम थांबवावे, अशी आमची मागणी आहे.

स्थानिक तबरेज सय्यद म्हणाले की, विकासाच्या नावाखाली ज्या प्रकारे पवई तलावाला संपवण्याचे प्रयत्न चालले आहेत ते थांबवावेत तसेच जो हा प्रकल्प आहे तो पर्यावरणासाठी तसेच येथील मगरींसाठी धोकादायक आहे म्हणून या प्रकल्पाचे काम थांबविण्यात यावं, अशी मागणी केली आहे.